तांत्रिक समस्यांमुळे गैरसोय; आधार सेवा केंद्रांचीही संख्या अपुरी

बँक खाते आधार क्रमाकांशी संलग्न करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ असल्यामुळे गेल्या काही दिवसांत बँक आणि आधार सेवा केंद्राबाहेर मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली आहे. मात्र, सेवा केंद्रांवरील अपुऱ्या सुविधा आणि तांत्रिक अडचणींचा फटका या संलग्न प्रक्रियेला बसत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

संख्येने कमी असणारी आधार सेवा केंद्रे नोंदणीसाठी घेण्यात येणाऱ्या नोंदणीधारकांची मर्यादित संख्या आणि संलग्नतेची मंदावलेली प्रक्रिया याचा फटका नागरिकांना बसत आहे. या केंद्रांकडून लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाल्यानंतर केंद्र शासनाने यातील काही केंद्रे बंद केली. सद्य:स्थितीत ५१ आधार सेवा केंद्रे मुंबईत सुरू आहेत.

यामधील बरीच केंद्रे ही बँक , जिल्हाधिकारी कार्यालय, पालिका विभाग कार्यालय, टपाल कार्यालय या ठिकाणी सुरू आहेत; परंतु यापैकी काही ठिकाणी एका दिवसासाठी ठरावीक  संख्येपर्यंतचीच नोंदणी केली जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय बँक कर्मचाऱ्यांना नियमित कामकाज सांभाळून नोंदणी आणि संलग्नीकरण अशा दोन्ही प्रक्रि या कराव्या लागत आहेत.

मुलुंड येथे राहणाऱ्या रुपाली पवार-शिर्के यांनी लग्नानंतर नावात झालेल्या बदलाची नोंद आधार कार्डवर करण्यासाठी मुलुंडमध्येच आधार सेवा केंद्रांचा शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी सेवा केंद्र न सापडल्याने त्यांनी थेट कुलाबा टपाल कार्यालय गाठले. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर दिवसाला केवळ २० जणांचीच नोंदणी होत असल्याचे तसेच सकाळी सात वाजता येऊन रांगेत उभे राहिल्यावरच नोंदणी होऊ शकेल, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती रुपाली पवार-शिर्के यांनी दिली.

परळ येथे राहणाऱ्या रामदास नाईक यांनादेखील अशाच प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. गेला महिनाभर बँकेमध्ये जाऊनही आधार नोंदणी होत नाही. मर्यादित संख्येतच आधार नोंदणी होत असल्याने आणि बऱ्याच वेळा तांत्रिक अडचणींमुळे केवळ २० ते २२ खातेदारांची नोंदणी केली जात असल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नोंदणी करण्यासाठी किमान अर्ध्या  तासाचा कालावधी जातो. त्यात बँकेच्या कामकाजाचा कालावधी केवळ आठ तास असल्याने नोंदणीबरोबरच नियमित कामकाजही सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातून मर्यादित संख्येनेच नोंदणीची प्रक्रिया करीत असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.