बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळया प्रतिक्रिया येत आहेत. कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे.

“कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांनाच सारखा कायदा लागू होतो, अशी अपेक्षा आहे. महापालिकेची टीम आता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर जाणार का? निश्चितच नाही…एवढी हिम्मत ते कशी दाखवू शकतात. सगळ्यांची वेळ येणार” असे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेकडून कारवाई, अनधिकृत बांधकामावर हातोडा

महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

महापालिकेकडून ही कारवाई होण्याआधी काल भाजपाचे मुंबईतील आमदार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन ‘मातोश्री’च्या जवळ असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

आणखी वाचा- ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’

“मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर वांद्रे पूर्वमध्ये असलेलं हे अनधिकृत बांधकाम महापालिकेला दिसत नाही ? कदाचित हे सरकारचे जावई असावेत. पण कंगना रणौतच घर आणि कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी महापालिकचे अधिकारी पोहोचले” असे अतुल भातखळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.