किटकांच्या हल्ल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या पर्जन्यवृक्षांना वाचवण्यासाठी त्यांना सुदृढ करणे आवश्यक असून मुळांना पाणी व हवा मिळण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. हरित लवादानेही झाडांभोवती एक बाय एक मीटर मोकळी जागा ठेवण्याचा निर्णय दिला होता. मात्र यासोबतच मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन झाडांसाठी जाळीदार पदपथ तयार करण्यासारखे वेगळे उपाय आखले जावेत असे मत वृक्षतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पर्जन्यवृक्षांवर गेली चार वर्षे किटकांचा पादुर्भाव वाढला आहे. त्यासंदर्भात पालिकेने नेमलेल्या वृक्षतज्ज्ञांच्या समितीने वृक्षांना वाचवण्यासाठी अनेक उपाय सुचविले. सुदृढ माणसाला कमी आजार होतात, त्याचप्रमाणे सुदृढ झाडेही किटकांच्या हल्ल्यांना परतवून लावतात. मात्र शहरातील पर्जन्यवृक्षांची झाडे कमकुवत झाली आहेत. त्यांच्या मुळांची नीट वाढत होत नाही. त्यासाठी कारणीभूत आहे ते म्हणजे वृक्षांच्या चोहोबाजूने केलेले कॉन्क्रीटीकरण. पावसाचे पाणी मुळांपर्यंत न पोहोचता वरचेवर वाहून जाते. मुळांना पसरणेही अवघड होते तसेच श्वसनासाठी लागणारी हवाही मिळत नाही व खोडाची वाढ होण्यास अटकाव होतो, असे डॉ. ओगले म्हणाले. खोडांभोवती जागा मोकळी ठेवण्याचा हरित लवादाचा निर्णय योग्य असला तरी केवळ तेवढीच जागा मोकळी ठेवून उपयोगाचे नाही, त्यासाठी एक साधा पण खासा उपाय म्हणजे जेथे पदपथ दोन मीटरपेक्षा रुंद आहेत तेथे रस्त्याकडील अध्र्या रुंदीचे पेवर ब्लॉक काढून त्याजागी रेतीच्या जाड अस्तरावर सिमेंटच्या भक्कम जाळ्या लावायल्या हव्यात. जाळ्यांमुळे पाणी जमिनीत मुरून मुळांभोवती हवाही खेळती राहील. जाळ्या भक्कम असल्यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनांनाही अडचण होणार नाही व पदपथांची सफाईदेखील नीट होऊ शकेल, असे डॉ. ओगले म्हणाले. महापालिकेने प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करून पाहावा. या जाळ्यातून कदाचित रानटी गवत उगवण्याची शक्यता आहे. असे गवत पावसाळ्यानंतर एकदा कापावे लागेल. पण गवताच्या मुळांमुळे जाळ्या स्थिर बसण्यास मदतच होईल. एक पाऊल आणखी पुढे जाऊन हेच तत्व जर इमारतीनाही लागू केले तर पावसाचे सर्व पाणी जे सध्या गटारात वाहून जाते त्यातील बराचसा हिस्सा जमिनीत मुरून रस्ते पाण्याखाली जाणेही कमी होऊ शकेल व शहरातल्या विहिरींचे पुनर्भरण होण्यास मदत होईल.

मैदानात, मोकळ्या जागेवर लावलेली झाडे उन्मळून पडण्याची संख्या रस्त्यालगतच्या झाडांच्या तुलनेने कमी आहे. आता लावलेल्या झाडांबाबत काही करणे शक्य नसले तरी यापुढे अरुंद जागेत झाडे न लावण्याची खबरदारी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे अनेकदा सांडपाण्यातील रसायनांमुळे मुळांना त्रास होतो, त्यामुळे अशा गटारांच्या शेजारीही झाडे लावू नयेत, असे मत वृक्ष अभ्यासक डॉ. चंद्रकांत लट्टू यांनी मांडले. थोडी देखभाल केली तरी पर्जन्यवृक्ष तसेच इतर झाडेही सुदृढ होतात. फोर्टचे वस्तुसंग्रहालय, विद्यापीठातील पर्जन्यवृक्ष आजही सुस्थितीत आहेत. झाडांच्या आजाराबाबतची उदासीनता सोडून द्यायला हवी, काहीसे खर्चिक, अडचणीचे वाटले तरी उपाय करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असेही लट्टू म्हणाले.

वृक्ष वाचवण्यासाठी सुचवलेले उपाय

*पदपथ तसेच रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकऐवजी सिमेंटच्या जाळ्या लावाव्यात.

*नवीन झाडांची अनिर्बंध वाढ, वाहतुकीला अडथळा तसेच झाडाची वाढीला अटकाव करणाऱ्या अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे.

*झाडांची छाटणी शास्त्रीय पद्धतीने व्हावी.

*किटकसंसर्ग झालेल्या झाडांच्या मुळांजवळ (बुंध्यात नव्हे) किटकनाशक द्यावीत.

*शक्य असल्यास भारतीय झाडे लावावीत.