मुंबई : तेलगी प्रकरणापासून ते एल्गार परिषद, भीमा कोरेगाव, मालेगाव बॉम्बस्फोट अशी विविध प्रकरणे हाताळणारे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल आता केंद्रीय अन्वेषण विभागाचा कार्यभार हाताळणार आहेत. पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून राज्य सरकारशी वाद झाल्यानंतर जयस्वाल यांची केंद्रात नियुक्ती झाली होती.

सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५ च्या महाराष्ट्र तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. शिक्षण इंग्रजी, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर बिझिनेस अ‍ॅडमिस्ट्रेशन विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. पोलिस दलातील ३५ वर्षांचा अनुभव जयस्वाल यांच्याकडे आहे.  गडचिरोली, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. औरंगाबाद शहरात दंगलखोरांवर वचक बसवणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी काम केले आहे. तसेच मुंबई मध्य प्रादेशिक विभागात अपर पोलीस आयुक्त, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच केंद्रात नियुक्तीवर असताना गुप्तचर संस्थेत ९ वर्ष काम केले. पंतप्रधान यांच्या सुरक्षा व्यवस्थेचेही जबाबदारीही त्यांनी हाताळली आहे.

जयस्वाल यांना २००९ साली राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय पोलीस पदक, अंतर्गत सुरक्षा पदक, महाराष्ट्र सरकारचे विशेष सेवा पदक हे सन्मान मिळाले आहेत.

…. पुन्हा राज्यात

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना २०१८ मध्ये जयस्वाल यांना पुन्हा राज्यात आणण्यात आले होते. जयस्वाल यांची २०१८ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. तर २०१९ मध्ये त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून  जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवादाच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर जयस्वाल यांनी केंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य केली होती.

तेलगी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी २००३ साली नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुखपद जयस्वाल यांच्याकडे होते. याप्रकरणात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी जयस्वाल यांनी केली होती.  पुढे हे प्रकरण सीबीआय़कडे सोपविण्यात आले. २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जयस्वाल यांच्याकडे होता.  तसेच एल्गार परिषद, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपासही जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होता.