25 January 2021

News Flash

‘जेईई’, ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवासाची मुभा

विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत

(संग्रहित छायाचित्र)

आजपासून (१ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या ‘जेईई’च्या, तर १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने सोमवारी रेल्वे प्रवासाची परवानगी दिली.

मुंबई महानगरात ‘जेईई’ची परीक्षा देणारे सुमारे २७ हजार विद्यार्थी असून, ‘नीट’ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच (हॉल तिकीट) रेल्वेप्रवासाची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरुन सध्या साडेतीन लाखांहून अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रत्येकी ३५० रेल्वेफे ऱ्या चालवते. अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नसल्याने कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, विरार येथून मुंबई शहराच्या दिशेने किंवा शहरातून उपनगराकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप होतो. बेस्ट, एसटी, खासगी वाहनाने प्रवास वेळखाऊ आहे. १ ते ६ सप्टेंबपर्यंत ‘जेईई’ची परीक्षा देणाऱ्या व १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचीच चिंता होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून रेल्वेप्रवासाच्या परवानगीची मागणी होत होती. यासाठी विद्यार्थी, प्रवासी संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनीही मागणी केली. मात्र, प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारचा असल्याचे मध्य व पश्चिम रेल्वेने स्पष्ट केल्यानंतर सोमवारी परवानगी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच रेल्वेप्रवास करता येईल. याच प्रवेशपत्रावर रेल्वेचे तिकीट मिळेल. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची गरज आहे की नाही, यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल. तर काही महत्वाच्या व गर्दीच्या स्थानकांतच जादा तिकीट खिडक्याही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेने दिली.

प्रवासासाठी मोठी कसरत

मुंबई उपनगरीय रेल्वे पहाटे ५ वाजल्यापासून सुरू होतात. सध्या दर दहा ते पंधरा मिनिटांनी रेल्वेसेवा आहेत. परंतु मोजक्याच व महत्वाच्या स्थानकात रेल्वेगाडय़ांना थांबा असल्याने ज्या स्थानकात थांबा नाही तेथील विद्यार्थ्यांचे काय, असाही प्रश्न आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील अप-डाऊन मार्गावर सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला,घाटकोपर, मुलुंम्ड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, टिटवाळा, आसनगाव, कसारा तर सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गादरम्यान सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, मानखुर्द, वाशी, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल स्थानकात रेल्वेगाडय़ा थांबतात. ठाणे ते पनवेल अप-डाऊन मार्गावर फक्त दोनच फेऱ्या होतात. पश्चिम रेल्वेवरुन धीम्या व जलद लोकलची सेवा आहे. डहाणू, विरारहून सुटणाऱ्या लोकल बोरीवलीपर्यंत धीम्या होतात व सर्व स्थानकात थांबतात. चर्चगेटहून सुटताना लोकल बोरीवलीपर्यंत जलद आणि त्यानंतर धीम्या होतात.

‘बेस्ट’चीही सुविधा

जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना बेस्टमधूनही प्रवास करण्याची मुभा असेल, अशी माहिती बेस्ट उपक्र माच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी प्रवेशपत्र बाळगावे, असेही बेस्टने स्पष्ट केले.

हजारो विद्यार्थ्यांना लाभ..

राज्यात ‘जेईई’साठी १ लाख १० हजार ३०० विद्यार्थी बसणार असून, मुंबई व नवी मुंबईत २० हजार २५६ आणि ठाण्यात ७ हजार १९१ विद्यार्थी आहेत. १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’च्या परीक्षेसाठी मुंबईतून २१ हजार ३९६, ठाण्यातून १० हजार ४२० आणि नवी मुंबईतून ८ हजार २७९ विद्यार्थी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:28 am

Web Title: jee neet students allowed to travel by train abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 गृहविलगीकरणातील १४,८०० रुग्णांवरील उपचार पूर्ण
2 राज्यात सर्वत्र चांगला पाऊस
3 ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पदवी परीक्षा
Just Now!
X