”चोमोलुंग्मा” अर्थात सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्ट मोहीम म्हणजे केवळ ६० हजार पौंडांचा खेळ झाला आहे. तुलनेने कमी अवघड असे हे शिखर असूनही आज एव्हरेस्टवर आरोहणासाठी हजारो लोकांची रांग लागली आहे. किंबहुना आज ‘पिक ट्रेडिंग’ च सुरू झाले आहे” असे रोखठोक मत इंग्लंडचे ज्येष्ठ गिर्यारोहक लेखक जिम पेरीन यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना मांडले. १५-१६ नोव्हेंबरला होणाऱ्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते इंग्लडहून सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पेरीन यांनी जागतिक गिर्यारोहणातील अपपवृत्ती, बदलते प्रवाह यावर आपली स्पष्ट मते मांडली. एव्हरेस्टबरोबरच अनेक हिमशिखरांवरील गिर्यारोहण मोहिमांमध्ये गेल्या काही वर्षांत सुरू असणारे व्यापारीकरण म्हणजे तर ‘पिक ट्रेडींग’च आहे, असा त्यांनी थेट आरोप केला. सध्याचे पाश्चात्यांचे गिर्यारोहण म्हणजे अहंकार कुरवाळणारे झाले असून हा एकप्रकारचा नववसाहतवाद आहे, असे ते सांगतात.
१२ व्या वर्षांपासून डोगर भटकंतीला सुरुवात करून, नंतरच्या काळात पट्टीचे प्रस्तरारोहक बनलेल्या जिम पेरीन यांनी आजवर गिर्यारोहणावर विविध वृत्तपत्रे, मासिकांतून मुबलक लिखाण केले आहे. ४० वर्षांपासून ‘गार्डियन’च्या ‘कंट्री यार्ड’ या सदराचे ते एक लेखक आहेत. गिर्यारोहकांतील माणूसपण मांडणारे ६० गिर्यारोहकांवर ‘गार्डियन’मधील त्यांनी लिहिलेले श्रद्धांजली लेख खूप गाजले आहेत. या  ६० ही गिर्यारोहकांबरोबर त्यांनी अनेक मोहिमांत सहभाग घेतला होता त्यामुळे त्याविषयी बोलताना ते काहीसे हळवे होतात. पण जिम ओळखले जातात, ते मुख्यत: गिर्यारोहणातील चुकांवर त्यांनी केलेल्या थेट भाष्यामुळे. पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या काही ठरावीक गिर्यारोहण मोहिमांवर ते याच भावनेतून अतिशय कडवट टीका करतात.
स्थानिकांच्या भाषेत ओळखली जाणारी हिमशिखरे ही त्याच नावाने जगन्मान्य व्हावीत, या त्यांच्या ठाम मतामुळे एव्हरेस्टच्या स्थानिक भाषेतील ‘चोमो लुंग्मा’ याच नावाचा ते आवर्जून उल्लेख करतात. गिर्यारोहण मोहिमांमध्ये स्थानिकांच्या भावभावना जपण्याला प्राधान्य देण्याबाबत भारतीय मोहिमा खूप जागरुक असतात, मात्र इतर देशांतील मोहिमा फारशा याकडे लक्ष देत नाहीत असे ते सांगतात. एखादे हिमशिखर सर केल्यावर त्या गिर्यारोहकाबद्दल ‘हिरो वर्शिपिंग’ सुरु होते. पण जर एखाद्याच्या चुकांबद्दल लिहिले तर मात्र गदारोळ होतो. मात्र अशा गदारोळास जिम पुरून उरले आहेत. काही थोर गिर्यारोहकांनी दावा केलेली यशस्वी आरोहणेही  कशी यशस्वी नव्हती, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे. मात्र कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकण्याची तयारी नसल्यामुळे याविषयावर फारसे बोलले जात नसल्याचे ते सांगतात.
जिम यांनी लिहलेल्या ‘व्हिलन’, ‘मेनलोव्ह’ या व्यक्तीचित्रणात्मक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. ‘मिर्स इन द क्लिफस्’, ‘द क्लाईंबिंग एसेज्’ अशी गाजलेली पुस्तके लिहिली आहेत. १९३० ते १९५० च्या दरम्यान अनेक कठीण गिर्यारोहण मोहिमा यशस्वी करणाऱ्या एरिक शिप्टन आणि टिलमन या गिर्यारोहकांच्या कारकीर्दीवर लिहिलेल्या ‘शिप्टन आणि टिलमन’ या पुस्तकाला यंदाचा हिमालयन क्लबचा पुरस्कार जाहीर झाला असून १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात तो त्यांना प्रदान करण्यात येईल.