लांब पल्ल्याची वा उपनेगरी रेल्वे गाडी असो. ही गाडी चालवत असताना ड्रायव्हर-मोटरमन्स या पैकी कोणीही गाडी चालविताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळला तर त्याच्यावर आता नोकरी गमावण्याची पाळी येऊ शकते. रेल्वे बोर्डाच्या दूरसंचार विभागाचे संचालक राकेश रंजन यांनी या बाबतचे एक पत्रक जारी केले असून त्यात नऊ प्रकारच्या सूचना संबंधिताना केल्या आहेत.
रेल्वे गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हर/मोटरमन यांच्यावर हजारो प्रवाशांच्या जिविताची जबाबदारी असते. एखाद्या वेळी गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या संबंधित चालकाचे सिग्नलकडे दुर्लक्ष झाले आणि अपघात झाला तर त्याची गंभीरता अधिक तीव्र असेल असे या पत्रकात राकेश रंजन यांनी म्हटले आहे. यामुळेच मोटरमन आणि ड्रायव्हर यांनी गाडी चालविताना आपला वैयक्तिक अथवा अधिकृत भ्रमणध्वनी बंद ठेवावा. आपत्कालिन परिस्थितीमध्ये त्यांना देण्यात आलेल्या वॉकीटॉकीचा वापर करावा, अशी सूचनाही या पत्रकात करण्यात आली आहे.
पत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चालकांनी आपल्या वैयक्तिक आणि अधिकृत भ्रमणध्वनीचा क्रमांक त्याच्या नेटवर्क कंपनीसह जाहीर करावा. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून नियंत्रण ठेवले जाईल. गाडी चालवत असताना त्याने त्याचा वापर केल्याचे  ‘कॉल रेकॉर्ड’वरून लक्षात आले तर त्याच्यावर विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील गार्डना  भ्रमणध्वनीचा अधिकृत वापर आपत्कालिन परिस्थितीमध्ये करण्यास परवानगी आहे. असा वापर झाला तर गार्ड आणि चालक यांनी प्रवासानंतर रेल्वे स्थानकातील अधिकृत नोंदवहीमध्ये त्याची नोंद करायची असून हे आदेश उपनगरी गाडय़ांमधील मोटरमन आणि गार्डनाही लागू आहेत. भ्रमणध्वनीवर  बोलू नये हे योग्य असले तरी प्रत्यक्षात त्याचाच आधार अनेकदा आपत्कालिन परिस्थितीमध्ये घ्यावा लागतो, याचा विचार रेल्वे बोर्डाने करावा आणि दूरसंचार यंत्रणा सुधारावी, असे मोटरमन संघटनेने या पत्रकावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.