20 February 2019

News Flash

लखनचा प्रवास : मंत्रालय बसस्थानक ते समता शिक्षण प्रसारक मंडळ (सातारा)

मे महिन्याच्या एका दुपारी 'लोकसत्ता'चे छायाचित्रकार वसंत प्रभू यांना मंत्रालय परिसरातील बसस्थानकावर एक मुकबधिर आणि गतिमंद मुलगा दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला.

| July 9, 2014 01:53 am

मे महिन्याच्या एका दुपारी ‘लोकसत्ता’चे छायाचित्रकार वसंत प्रभू यांना मंत्रालय परिसरातील बसस्थानकावर एक मुकबधिर आणि गतिमंद मुलगा दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळला. या मुलाबाबत त्यांनी अधिक माहिती गोळा केली असता, लखन सावंत काळे नावाचा हा मुलगा त्याच्या आजीबरोबर पदपथावरच राहत असल्याचे समजले. लखनला बसस्थानकावर बांधून आपण कामाला जात असल्याचे त्याच्या आजी सखूबाई काळेने सांगितले.

त्यानंतर, ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रात आलेल्या या छायाचित्राची आणि वृताची दखल घेत मरिन ड्राईव्ह पोलिसांनी लखन आणि त्याच्या आजीला मरिन ड्राईव्ह पोलिस स्थानकात नेले. तेथे आलेल्या एका अन्य महिलेच्या ओळखीने लखनची रवानगी डोंगरीच्या बालसुधार गृहात करण्यात आली.

लखनने काही महिने या बालसुधार गृहात काढले, परंतु, तेथील वातावरण त्याला न मानवल्याने सामाजिक कार्यकर्त्या मिना मुथा यांनी ‘मुकबधिर विदयार्थी वसतिगृह’, अंबवडे खुर्द, परळी, सातारा या सामाजिक संस्थेशी संपर्क साधून त्याच्या शिक्षणाची आणि राहण्याची चांगली सोय होण्यासाठी प्रयत्न केले.

मुकबधिर विदयार्थी वसतिगृहाने त्याच्या राहण्याची सोय केली असून, ‘समता शिक्षण प्रसारक मंडळा’च्या मुकबधिर शाळेत त्याच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या सर्व कामात मुकबधिर विदयार्थी वसतिगृहाचे प्रमुख पार्थ पोलके यांनी मोलाचे योगदान दिले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या या नव्या दोस्ताचे मोठ्या आनंदात स्वागत केले.

आता लखनला नवीन मित्र आणि मैत्रिणी मिळाल्या असून, तो त्यांच्याबरोबर आनंदाने राहत आहे. तर, असा होता मंत्रालय परिसरात बसस्थानकाला जखडलेल्या लखनचा समता शिक्षण प्रसारक मंडळपर्यंतचा प्रवास.


(सर्व छायाचित्रे – वसंत प्रभू)

First Published on July 9, 2014 1:53 am

Web Title: journy of special child lakhan
टॅग Kid,Kids,Special Child