News Flash

शिवसेनेने ‘कडोंमपा’चा गड राखला, पण बहुमताची हुलकावणी

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

भाजपकडून महापौर पदासाठी शिवसेनेपुढे अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला अद्यापही शिवसेनेची मंजूरी मिळालेली नाही.

शिवसेना-भाजपमधील वाकयुद्धामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमताचा आकडा गाठता सेनेला आलेला नाही. कल्याण-डोंबिवलीच्या १२२ जागांपैकी ५१ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर, ४३ जागांवर भाजपचे ‘कमळ’ उमलले. पण बहुमताचा आकडा गाठता न आल्याने सेनेला आता सत्तेच्या समिकरणासाठी नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या काळात एकमेकांचे वाभाडे काढणारे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? की भाजपला इंगा दाखवण्यासाठी शिवसेना इतर पर्याय चाचपडून पाहणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा भरघोस यश मिळाले. नऊ जागांवरून भाजपने मुसंडी मारत ४३ जागांवर विजय प्राप्त केला. तर, मनसेचे इंजिन मात्र यावेळी थंड पडले. मागच्या वेळेस २७ जागांवर यश मिळवलेल्या मनसेला दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही. मनसेचे केवळ ९ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची स्थिती तर स्पर्धेतून बाहेर फेकल्यासारखी आहे. आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ‘एमआयएम’ने येथे खाते उघडून प्रस्थापितांना धक्का दिला आहे. वॉर्ड क्र.३४ मध्ये ‘एमआयएम’च्या उमेदवार सकीला खान विजयी झाल्या आहेत. शिवसेना सर्वाधिक जागा मिळवून अव्वल स्थानी असला तरी स्पष्ट बहुमतासाठी शिवसेनेला अजूनही ११ जागांची आवश्यकता आहे.

दरम्यान, सकाळी निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरूवात होताच शिवसेनेने पहिल्या तासाभरातच मुसंडी मारली होती. दुपारपर्यंत शिवसेनेने आघाडी कायम राखत अर्धशतक देखील गाठले आणि कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेनेचा जल्लोष सुरू झाला.
वाघावर चाल करून येणाऱयांना त्यांची जागा दाखवून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ‘एकदा करुन दाखवले’, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केल्या. दुपारपर्यंत शिवसेनेने मुसंडी मारत एकूण ६१ जागांवर आघाडी घेतली होती तर, भाजपकडे ३० जागांवर आघाडी होती. मात्र, सरतेशेवटी शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली आणि ६१ जागांवरील आघाडीचा आकडा निकाल हाती येईपर्यंत ५१ पर्यंत खाली आला.

शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी दिग्गजांच्या पराभवाचा धक्का सेनेला यंदा सहन करावा लागला. विद्यमान महापौर कल्याणी पाटील यांचा भाजपच्या सुमन निकम यांनी पन्नास मतांनी पराभव केला. तर, शिवसेनेचे सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांची मुलगी शिल्पा शिंदे देखील पराभूत झाल्या.  मत मोजणीस सुरूवात झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास पहिला निकाल हाती आला. वॉर्ड क्र. १० मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष तरे विजयी झाले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे खाते उघडण्यास सुरूवात झाली आणि काही वेळातच शिवसेनेने मुसंडी मारत आघाडीचे अर्धशतक गाठले. सुरुवातीला पोस्टाने आलेली मते मोजल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेने परस्परांविरोधात दंड थोपटून अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी मात्र फारसा उत्साह दाखवला नव्हता. रविवारी या दोन्ही शहरांतील केवळ ४७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. कमी मतदान झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

पक्षीय बलाबल-
शिवसेना- ५१ , भाजप-४३, मनसे-९, काँग्रेस- ४, राष्ट्रवादी- २, बसप- १, एमआयएम-१, अपक्ष- ९

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2015 10:35 am

Web Title: kalyan dombivali election counting begins
टॅग : Kdmc
Next Stories
1 ‘मिस्ड कॉल’ द्या, गाडय़ांची माहिती मिळवा!
2 ‘परे’वरील जुन्या गाडय़ांचे ‘मरे’वर रडगाणे!
3 कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला ८ नोव्हेंबरचा मुहूर्त!
Just Now!
X