सोशल मीडियातून द्वेषमूलक पोस्ट केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोलीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

गेल्या महिन्यांत वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना आदेश दिले की, तक्रारदार मुनव्वर अली सय्यद यांच्या तक्रारींची दखल घेत तपास करण्यात यावा. कोर्टाच्या आदेशनुसार, वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि रंगोलीविरोधात आयपीसी कलम १५३ अ, २९५ अ, १२४-अ नुसार एफआयआर दाखल करण्यात आला.

तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले की, “कंगनाने सातत्याने ट्विटर आणि टिव्ही मुलाखतीच्या माध्यमातून बॉलिवूडला घराणेशाहीचा आरोप करत बदनामी केली आहे. कंगना आपल्या वक्तव्यांमधून हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये जातीय तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या आक्षेपार्ह ट्विट्समधून केवळ त्यांच्या धार्मिक भावनाच नव्हे तर त्यांच्या चित्रपटातील सहकाऱ्यांबद्दल वाईट भाषा वापरल्याचंही तक्रारदारानं म्हटलं आहे.