महाराष्ट्रात कुंपणावरील आमदारांसाठी योग्य संदेश

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलातून फुटलेले आमदार पोटनिवडणुकीत विजयी झाल्याने राज्यात भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतील कुंपणावरील आमदारांना पोटनिवडणुकीत विजयी होऊ शकतो, हा संदेश गेला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सत्तेत आले असले तरी राज्यात सत्ताबदल होऊ शकतो, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतो. महाआघाडीचे सरकार केव्हाही गडगडू शकते, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर हळूहळू चित्र समोर येईल, अशी भाजप नेत्यांची प्रतिक्रिया आहे. कर्नाटकातही मंत्रिमंडळ विस्तारानंतरच ठिणगी पडली होती. राज्यातही मंत्रिपदावर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीतील आमदारांचा डोळा आहे. शिवसेनेत उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची परंपरा नाही. पण काँग्रेसमध्ये मंत्रिपदावर संधी न मिळालेले उघडपणे पक्षाला धमकी देतात. कर्नाटकातही तसेच झाले होते. मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वाट पहा, नंतर कोण पक्षाशी किती एकनिष्ठ आहेत हे समजेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होत आहे. कर्नाटकातील १५ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्याने राज्यात भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. राज्यात लवकरच पुन्हा सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवडय़ात विधानसभेतील भाषणाच्या वेळी केला होता.  एखादा नेता किंवा आमदारांचा गट फुटल्याशिवाय भाजपला सत्ता मिळणे कठीण दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६९ मते मिळाली होती.  याचाच अर्थ भाजपकडे ११४ एवढे संख्याबळ आहे. सत्ता स्थापण्याकरिता अजून ३१ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. आमदारांनी राजीनामे दिले तर त्यांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागेल. पक्षांतर केलेल्या आमदारांना कर्नाटकातील १२ मतदारसंघांतील मतदारांनी स्वीकारले. हा संदेश कुंपणावरील आमदारांसाठी महत्त्वाचा आहे.

जनादेशाचा अनादर करण्यांना धडा – फडणवीस

जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना जनता धडा शिकविते हे कर्नाटकमधील पोट-निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जनादेशाचा अपमान करून सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या संधीसाधूंना मतदार नाकारतात हे सुद्धा या निकालावरून स्पष्ट झाले. संधीसाधू राजकीय पक्षांकरिता हा सूचक इशारा असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

जनतेने धडा शिकवला-पंतप्रधान

बरही/बोकारो: कर्नाटकमधील निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील प्रचारसभांदरम्यान प्रतिक्रिया व्यक्त केली. जनादेश धुडकावणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला अशी टीका पंतप्रधानांनी काँग्रेसवर केली. काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी जनतेने जो कौल दिला होता त्याचा अनादर करण्याचा प्रयत्न केला. अखेर मतदान यंत्रांमधून  त्यांना चोख उत्तर दिले असे बारही येथील प्रचारसभेत पंतप्रधानांनी स्पष्ट केले. तीन कारणांमसाठी हा निकाल महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधानांनी बोकारे येथील सभेत सांगितले. जनतेला स्थिर सरकारची गरज तसेच जनादेश धुडकावणे म्हणजे मतदारांचा अवमान व भाजप विकास करु शकते असा विश्वास निर्माण झाला. या मुद्दय़ांवर कर्नाटकच्या मतदारांनी कौल दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही ठिकाणी सभांमध्ये पंतप्रधानांनी कर्नाटकमधील निकालांवर भर दिला होता.

जनता दलाचे नुकसान : पोटनिवडणुकांमध्ये सर्वाधिक नुकसानदेवेगौडा यांच्या जनता दलाचे झाले. राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये जनता दलाच्या तिघांचा समावेश होता. १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनता दलाला भोपळाही फोडता आला नाही. जनता दलाच्या उमेदवारांना तीन मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये लक्षणिय मतेही मिळालेली नाहीत.