राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ.किसन महाराज साखरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रुपये पाच लक्ष रोख,  मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर  सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.   यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्काराच्या निवडीसाठी मंत्री, सांस्कृतिक कार्य श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील श्री चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, श्री भास्करराव आव्हाड आणि श्री सय्यदभाई आदी सदस्यांच्या समितीने काम पाहिले.डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेली गेल्या ५७ वर्षापासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासू ते संत वाड्.मयावर लेखन करीत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये  श्री ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेदेखील कार्य केलेले आहे.
ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा,सो्‌हम योग,योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी १०० हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. प्रतिवर्षी १ मे ते ३१ मे या कालावधीत विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क संस्कार शिबीराचे आयोजन करत असतात.  अनेक संस्थांवर त्यांनी विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून दृकश्राव्य रुपात ती इंटरनेट (Internet) वर उपलब्ध करुन  देण्याचा पहिला प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे. १९९० साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे. संत साहित्यातील योगदानाबद्‌दल त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी.लीटसाठी होणाऱ्या परिक्षांसाठी त्यांनी परिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री तावडे यांनी आज येथे सांगितले.