दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात यंदाही विघ्ने उभी ठाकली आहेत. गणेशोत्सवासाठी गाव-घर गाठणाऱ्या असंख्य चाकरमान्यांचा मुख्य आधार मुंबई-गोवा महामार्गच असतो. पण अवजड वाहनांची गर्दी आणि त्यात गावी जाणाऱ्या गाडय़ा यामुळे दरवर्षी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच यंदा पावसामुळे या महामार्गावर प्रचंड खड्डे असल्याने येथील प्रवास वेळखाऊ आणि जीवघेणा ठरण्याची चिन्हे आहेत.
या मार्गावर पर्याय म्हणून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि पुणे-कोल्हापूर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. मुंबईतून पुणेमार्गे कोल्हापूर गाठून तेथून कोकणात जावे, असा सल्ला सरकारने दिला आहे. मात्र, हा मार्ग चाकरमान्यांच्या खिशाला भगदाड पाडणारा आहे. या मार्गावर अगदी नवी मुंबईपासून एक्स्प्रेस वे, खेड शिवापूर, आणेवाडी, तासवडे या ठिकाणी असणाऱ्या टोलनाक्यांवर प्रत्येक गाडीला जाण्यायेण्याचे किमान ९५० रुपये मोजावे लागतात. याशिवाय या मार्गाने कोकणात खाली उतरताना किमान १००-१२५ किमी अंतर जास्त कापावे लागते. त्यामुळे या प्रवासासाठी इंधनखर्चही वाढणार आहे. एसटी अथवा खासगी बसनेही या मार्गे कोकणात जाणे कठीण आहे. कारण कोल्हापूर येथून थेट कोकणात जाणाऱ्या गाडय़ा मिळत नाहीत. त्यामुळे तो पर्यायही अडचणीचाच ठरतो. कोकण रेल्वेने जाणे हा पर्याय असला तरी कोकण रेल्वेच्या गाडय़ांचे आरक्षण आधीच फुल्ल होत असल्याने आता जायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा ठाकणार आहे.