५० रुपये तिकीट असलेली पनवेल-चिपळूण विशेष डेमू गाडी बंदच

गणेशोत्सवात पनवेल ते चिपळूण असा ५० रुपयांत स्वस्त प्रवास घडविणारी विशेष गाडी मध्य रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या वर्षांपासून बंद करावी लागली आहे.  रेल्वेच्या ताफ्यात डेमूची संख्या जास्त नसल्याने व देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होत असल्याने कोकणवासीयांसाठी असलेली ही गाडी बंद करावी लागल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात.

मध्य रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण विशेष डेमू गाडी २०१५ मध्ये चालवण्यात आली. या गाडीचे भाडे ५० रुपये ठेवण्यात आले. प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळण्याचा अंदाज बांधत त्याच्या ४० फेऱ्या चालवण्यात आल्या. डेमूला एक वातानुकूलित डबाही जोडून त्याचे तिकीट आरक्षित ठेवण्यात आले होते. या तिकिटाची किंमत ३९५ रुपये होती. पेण, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड आणि अजनी या मधल्या स्थानकांवर थांबेही देण्यात आले. पनवेलहून सकाळी ११.१० वाजता ही गाडी सोडण्यात येत असे. तर चिपळूणहून सायंकाळी साडेपाच वाजता गाडी सोडली जात असल्याने ती पनवेलमध्ये रात्री साडेदहा वाजता पोहोचत होती.  चांगला प्रतिसाद मिळत असतानाही २०१६ मध्ये गणेशोत्सवदरम्यान ३६ फेऱ्या चालविण्यात आल्या. २०१७ पासून ही गाडी चालविणे मध्य रेल्वेने बंदच केले. रेल्वेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या चारच डेमू गाडय़ा ताफ्यात असून दिवा, वसईसह अन्य मार्गावर त्या धावतात. त्यामुळे पनवेल-चिपळूण मार्गावर गाडी चालवणे शक्य नाही. तसेच या गाडीचा देखभाल-दुरुस्तीचाही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

पनवेल-चिपळूण डेमू गाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करणारे पत्र तीन महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात देण्यात आले होते. मात्र रेल्वेने यावर निर्णय घेतला नाही.     – राजू कांबळे, संस्थापक, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ