मालगाडी घसरल्यानंतर कोलमडलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक अजूनही सुरळीत झालेले नसल्याने रेल्वेगाडय़ा उशिराने धावत आहेत. परिणामी, गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वेस्थानकांमध्ये या गाडय़ांची ताटकळत वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे रेल्वेच्या कारभाराविषयी चाकरमान्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून यातूनच चाकरमान्यांनी बुधवारी सकाळी जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास रोखून धरली होती.
कोकणातील रेल्वेगाडय़ा तब्बल १२ ते १८ तास उशिराने धावत असल्यामुळे गणेशोत्सवासाठी निघालेल्या शेकडो चाकरमान्यांना कुटूंबासोबत स्थानकातच आसरा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता ठाणे स्थानकात येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस बुधवारी दुपारी बारा वाजता आली. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ठाणे स्थानकात येणारी मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस बुधवारी दुपारी आली. असे असतानाच बुधवारच्या गाडय़ा स्थानकात कधी येणार, याविषयी कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ठाणे स्थानकातील प्रवाशी संतप्त झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस ठाण्यात आली मात्र, ती आधीच फुल असल्याने ठाणे स्थानकातील प्रवाशांना त्यामध्ये शिरता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत ही गाडी रोखून धरली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांची समजूत काढत काही वेळात विशेष गाडी येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा मार्ग मोकळा करून दिला.