News Flash

‘रिकाम्या’ तेजसला जादा थांबे?

याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

‘रिकाम्या’ तेजसला जादा थांबे?

 

प्रवासी संख्या वाढवण्यासाठी कोकण रेल्वेकडून विचार 

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी तेजस एक्स्प्रेस गाडी आरामदायी सुविधांमुळे प्रसिद्ध झाली असली तरी, या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी रिकाम्या धावणाऱ्या ‘तेजस’मुळे रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे आता या गाडीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘तेजस’च्या मार्गावर जास्त थांबे उपलब्ध करून देण्याचा विचार कोकण रेल्वे करत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

विमान प्रवासासारख्या सुविधांची रेलचेल असलेल्या तेजस एक्स्प्रेसला गतवर्षी २४ मेपासून हिरवा कंदील दाखवण्यात आला. आठवडय़ातून पाच दिवस धावणारी ट्रेन सीएसएमटी-करमाली अंतर अवघ्या साडेआठ तासांत कापते. मात्र, या अतिजलद गाडीला अवघे पाच थांबे दिले असल्याने प्रवाशांकडून या गाडीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला आकर्षणापोटी झालेल्या गर्दीचा अपवाद वगळता या गाडीतील प्रवासी संख्या सरासरी ४० ते ४५ टक्के इतकी राहिली आहे. सुट्टीचे दिवस वगळता अन्य दिवशी ही गाडी रिकामी धावत असते.

तेजस गाडीची वेळ आणि फक्त पाच थांबे यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. या गाडीला जास्तीत जास्त थांबे देण्यात यावे अशी मागणी प्रवासी करत आहेत. एकंदरीतच प्रवाशांचा विचार करता कोकण रेल्वेकडून एक प्रस्ताव तयार केला जात आहे.

प्रस्तावानुसार, प्रवाशांकडून सावंतवाडी, कणकवली आणि थिवीम स्थानकात थांबा देण्याची मागणी केली जात आहे. त्याचा विचार करता मडगावहून ट्रेन सोडण्यावर कोकण रेल्वे विचार करत आहे. मडगावहून सोडतानाच या तीन स्थानकांतही थांबा देणे कितपत योग्य राहील याचा अभ्यास केला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी तेजस ट्रेनला मिळू शकतील, अशी अपेक्षा रेल्वेला आहे. तसेच ही गाडी सीएसएमटीतून सकाळी पाच वाजता, तर दुपारी अडीच वाजता करमाळी येथून सुटते. त्यातही काही बदल केला जातो का, याची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डबल डेकरऐवजी तेजस?

कोकण मार्गावर वातानुकूलित डबल डेकर ट्रेन सुरुवातीला एलटीटी ते करमाळी सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांनंतर करमाळी ऐवजी मडगांवपर्यंत चालविण्यात आली. परंतु या गाडीच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, मुंबईतून गाडी सुटण्याची असलेली वेळ आणि ठिकाण यामुळे प्रवाशांनी डबल डेकरकडे पाठ फिरवली. फक्त सरासरी ३० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने अखेर गाडी बंद करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून आरक्षण रद्दच करण्यात आले आहे. ही गाडी बंद केली तर त्याऐवजी तेजस गाडीची फेरी चालवण्याची चाचपणी केली जात आहे.

तेजसचे सध्याचे थांबे

  • सीएसएमटी (सुटण्याचे ठिकाण), दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ

तेजस गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी त्याला जास्तीत जास्त थांबे देतानाच कोकणातील त्याचा शेवटच्या थांब्यात बदल होऊ  शकतो का याची चाचपणी सुरू आहे. या गाडीच्या वेळेचाही मुद्दा आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्यावर कामही सुरू आहे.

एल.के. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 5:05 am

Web Title: konkan railway thinking to increase tejas express stops
Next Stories
1 शाळा भूखंडावरील कार्यक्रमाची चौकशी
2 सेनेची कोंडी करण्याची भाजपची संधी वाया
3 यारी रोडवरील खारफुटीलाही आग