उपलब्ध अतिदक्षता खाटांची संख्या ५६ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर; पुरेशा खाटा उपलब्ध असल्याचा पालिकेचा दावा

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : शहरातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढू लागल्याचा परिणाम थेट रुग्णालयांत उपलब्ध असलेल्या खाटांच्या संख्येवर होत आहे. मोठय़ा करोना आरोग्य केंद्रामधील उपलब्ध अतिदक्षता खाटांची संख्या गेल्या १५ दिवसांत ५६ टक्कय़ांवरून २५ टक्कय़ांवर आली आहे. खासगी रुग्णालयांत सध्या केवळ दहा कृत्रिम श्वसनयंत्रणा असलेल्या खाटा रिक्त असल्याची माहिती मिळते. या परिस्थितीमुळे रुग्णांची अडचण होण्याची भीती असली तरी, पालिकेच्या करोना केंद्रांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव, पाठोपाठ झालेले शिथिलीकरण, सार्वजनिक वाहतूक सुविधांअभावी बेस्ट-एसटी-रेल्वेत होणारा गर्दीचा प्रवास यामुळे एका बाजूला रुग्णसंख्या वाढते आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या अधिक दिसत असल्याचे पालिका प्रशासनातर्फे  सांगितले जात असले तरी त्यामुळे रुग्णालयांवरही ताण येतो आहे. दुसरीकडे मध्यमवर्गीय, उच्चभ्रूंचा कल खासगी रुग्णालयांत दाखल होण्याकडे आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात खासगी रुग्णालयात दहा टक्के अतिदक्षताच्या खाटा उपलब्ध होत्या. यामध्ये अधिकच घट होत सध्या शहरात केवळ पाच टक्के म्हणजे २९ खाटा आणि दहा कृत्रिम श्वसन यंत्रणा खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत.

मोठय़ा करोना आरोग्य केंद्रामध्ये २४४ अतिदक्षता खाटा असून ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात यातील केवळ ४३ टक्के खाटा भरलेल्या होत्या. त्याच वेळी खासगी रुग्णालयात खाटांची कमतरता होती; परंतु या केंद्रामध्ये येण्यास रुग्ण तयार नव्हते. आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने केंद्रामधल्याही जवळपास ७५ टक्के अतिदक्षताच्या खाटा भरल्या असून ६१ खाटा रिक्त आहेत, तर ३८ कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध आहेत. तसेच साधारण आणि ऑक्सिजनयुक्त खाटांवरील रुग्णांची संख्या जवळपास दोन हजारांनी वाढलेली आहे.

पालिकेकडून तयारी

गोरेगावच्या नेस्कोमध्ये २०० आणि वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियामधील (एनएससीआय) ५० अशा २५० अतिदक्षता खाटांचे कामकाज जुलैमध्येच पूर्ण झाले होते; परंतु मनुष्यबळाअभावी या कार्यान्वित झाल्या नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिचारिका आणि वॉर्डबॉय काही पालिकेचे आहेत, तर काही कंत्राटी तत्त्वावर घेतले आहेत. डॉक्टरांचीही नियुक्ती केली आहे. तेव्हा दोन दिवसांत २०० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू होणार असल्याचे नेस्को करोना केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. आता उच्चभ्रू सोसायटीतील रुग्णही येथे दाखल होत आहेत. २० अतिदक्षता खाटा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुलुंड करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली. एनएससीआयमध्येही ३० अतिदक्षता खाटा कार्यान्वित होणार आहेत.

 

उपलब्ध खाटा

रुग्णालय       अतिदक्षता                      कृत्रिम  श्वसनयंत्रणा

पालिका           ४७                                   ३४

खासगी           २९                                    १०

(बुधवापर्यंतची आकडेवारी)

मोठय़ा करोना आरोग्य केंद्रात अतिदक्षता खाटा उपलब्ध आहेत. येथील रुग्णसेवा दर्जेदार करण्यासाठी जवळील मोठय़ा खासगी रुग्णालयांचेही मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तेव्हा रुग्णांनी या केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल व्हावे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका