दोनच निविदा आल्याने १४ मार्चपर्यंत मुदतवाढ

ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळवासीयांच्या पुनर्विकासासाठी जारी केलेल्या जागतिक निविदेची अंतिम मुदत संपेपर्यंत एल अँड टी आणि शापुरजी पालनजी या दोन बडय़ा विकासकांनी निविदा सादर केल्या आहेत. परंतु केंद्रीय दक्षता समितीच्या सुचनेनुसार दोनच निविदा आल्यानंतर मुदतवाढ देण्याची तरतूद असते. त्यानुसार आता १४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही निविदा न आल्यास यापैकी एकाची विकासक म्हणून नियुक्ती होऊ शकणार आहे.

वरळी वगळता बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी म्हाडाने आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली. निविदापूर्व बैठकीच्या वेळी सात ते आठ विकासकांनी रस दाखविला होता. मात्र निविदा सादर झाल्या नव्हत्या. त्यामुळे धारावीपाठोपाठ बीडीडी चाळ पुनर्विकासाचाही फज्जा उडतो का, याची चिंता शासनापुढे निर्माण झाली होती. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत एल अँड टी आणि शापुरजी पालनजी यांनी प्रत्यक्षात निविदा सादर केल्यामुळे म्हाडा प्रशासन आशावादी झाले आहे. अद्याप वरळी या सुमारे ५९.६९ एकर भूखंडावर पसरलेल्या बीडीडी चाळींसाठी निविदा जारी करण्यात आलेल्या नाहीत.

धारावी प्रकल्पासाठीही  आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या होत्या. अनेक देशांच्या दूतावासातही या निविदा पाठविण्यात आल्या होत्या. निविदापूर्व बैठकीत तब्बल १६ बडे विकासक सहभागीही झाले होते. त्यांनी प्राधिकरणापुढे अनेक अटी ठेवल्या. त्यापैकी बहुसंख्य अटी मान्यही करण्यात आल्या. परंतु तरीही शेवटच्या दिवसापर्यंत धारावी पुनर्विकासासाठी एकही निविदा सादर झाली नाही. आता बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी दोन बडय़ा विकासकांनी रस दाखविला आहे. तरीही त्यात स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-निविदातील तपशील पुढीलप्रमाणे

  • ना. म. जोशी मार्ग – १३.९ एकर (बांधकाम एरिया – ५,१५,८७२.८५ चौरस मीटर) : २२ मजल्याच्या पुनर्विकासाच्या १४ इमारती; खुल्या विक्रीसाठी – उच्च व मध्यम उत्पन्न गटासाठी ४७ मजली दोन टॉवर.
  • नायगाव – १३.३९ एकर (बांधकाम एरिया – ६,६८,२०२ चौरस मीटर) : १९ ते २३ मजल्याच्या पुनर्विकासाच्या २० इमारती; खुल्या विक्रीसाठी – उच्च व मध्यम उत्पन्न गटासाठी ६० मजली चार टॉवर्स, २० मजली व्यापारी संकुल.

ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी २८ डिसेंबर २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली. या निविदेची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी ही होती. तोपर्यंत दोनच निविदा आल्याने केंद्रीय दक्षता समितीच्या सुचनेनुसार मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही आणखी निविदा न आल्यास या दोनपैकी एका विकासकाची निवड केली जाईल   – संभाजी झेंडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा