राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक; विधान परिषदेसाठी आज माघार घेण्याची मुदत

विधान परिषदेच्या मुंबई प्राधिकारी मतदारसंघातील दुसऱ्या जागेकरिता मनसेची भूमिका निर्णायक असताना, मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्याने मनसेच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचा बंडखोर कोणती भूमिका घेतो यावर दुसऱ्या जागेचे भवितव्य ठरणार आहे. नगरमध्ये आघाडीचा धर्म पाळण्याकरिता बंडखोराला माघार घेण्याचा आदेश काँग्रेसने दिला आहे.
मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जातो. दुसऱ्या जागेकरिता काँग्रेसचे विद्यमान आमदार भाई जगताप, भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यात लढत आहे. २८ नगरसेवक असलेल्या मनसेचा पाठिंबा हा निर्णायक होता. ३५ नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या भाजपची सारी मदार ही राज ठाकरे यांच्यावर होती. मनसेचा पाठिंबा मिळाल्यास भाजपला १० ते १२ मतांची व्यवस्था करावी लागली असती. पण मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला. या निवडणुकीत आमचे नगरसेवक तटस्थ राहतील, असे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. मनसेच्या या भूमिकेमुळे भाजपच्या आशेवर पाणी फिरले. भाजपने कोटक हा बिगर मराठी उमेदवार रिंगणात उतरविल्याने मनसेने पाठिंबा देण्यास नकार दिल्याचे समजते.
मनसेच्या भूमिकेने काँग्रेसचे भाई जगताप यांना फायदा होणार असला तरी राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या गोटात अजूनही चुळबुळ आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात हातमिळवणी झाल्याची चर्चा आहे. उद्योजक प्रसाद लाड हे राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या जवळचे मानले जातात. पक्षाच्या नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय लाड उमेदवारी दाखल करूच शकत नाहीत, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते. ‘लाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असून, त्यांना पक्षाचा पाठिंबा नाही. आघाडीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नगरसेवक काँग्रेसला मतदान करणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यायची आणि लाड यांना भाजपने मदत करायची अशी रणनीती असू शकते. यामुळेच लाड माघार घेण्याची चिन्हे नाहीत.

राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरू -चव्हाण
नगरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांनी बंडखोरी केली आहे. मात्र ससाणे यांना माघार घेण्याचा आदेश देण्यात आला असून, काँग्रेसचे सारे सदस्य राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. अन्यत्र माघारीकरिता राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

भाजप-सेनेच्या नगरसेवकांची आज बैठक
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची एक संयुक्त बैठक शनिवारी रात्री ८ च्या सुमारास एमआयजी क्लबमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असल्याची चर्चा सुरू होती.