|| संदीप आचार्य

ऑनलाइन अभ्यासाचा आगळा प्रयोग; शिक्षक-पालकांसह महाविद्यालयीन कार्यकर्तेही सहभागी

मुंबई : करोना आणि टाळेबंदीने देशातील लक्षावधी विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा विषय आ वासून उभा असताना सांताक्रूझ पूर्व येथे मतिमंद मुलांच्या शाळेत मात्र मे अखेरपासून ऑनलाइन अभ्यासक्रमाचा जो प्रयोग सुरू आहे, त्यात आजतागायत खंड पडलेला नाही. केवळ शिक्षक-पालकच नव्हे तर या उपक्रमाला जोडलेले काही महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यकर्तेही समरसून यात सहभागी झाले आहेत.

शालेय मुलांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देण्याचे प्रयोग सुरु आहेत. परंतु त्याला ठोस दिशा मिळालेली नाही. अशावेळी गेल्या एक तपाहून अधिक काळ सांताक्रूझ, कुर्ला आदी परिसरातील झोपडपट्ट्यातून राहणाऱ्या गतिमंद मुलांसाठी सांताक्रूझ पूर्व येथील प्रभाग कॉलनी शाळेत चालणाऱ्या ‘गुरूकुल’ संस्थेच्या शाळेने ‘गुगल मीट’च्या माध्यमातून मे महिन्यापासूनच ऑनलाइन शाळा सुरू केली. वस्तीतले पालक एकतर अशिक्षित आणि हातावर पोट असलेले. त्यांच्या वेळा सांभाळून त्यांना मुलांच्या अध्यापनात सहभागी करून घेणे गरजेचे होते. तत्पूर्वी त्यांना मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे लागले. त्यानंंतर ऑनलाइन तंत्रज्ञान हाताळणी हे दुसरे आव्हान होते. गुरूकुलचे प्रमुख सुनील सातपुते, शिक्षण विभागाच्या प्रमुख भक्ती वाळवे यांनी ही आव्हाने पेलली. वाळवे यांनी प्रथम ऑनलाइन शिक्षणाबाबतचे तंत्र आत्मसात केले. बरोबरच्या शिक्षकांना ते शिकवले. प्रेमा पाल, कल्पना मोरे व मंदाकिनी शेजवळ या तीन शिक्षकांच्या मदतीने वाळवे हे आव्हान पेलत आहेत.

त्यांच्या मदतीसाठी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले दहा तरुण स्वयंसेवक  निष्ठेने मुलांना शिकविण्यासाठी कटिबद्ध आहेत. आयआयटीची पदवीधर असलेली  साबा नासीर पठाण, तसेच गौरी सिंग, अपर्णा कर्णिक, ज्योती शहापूरकर, नुपूर सक्सेना, अभिलाषा राजपुत, लक्ष्मी मिश्रा हे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून सेवाभावाने काम करत आहेत.

मोठ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी

सहा वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतचीच मुले गतिमंद शाळेत असण्याबाबतचे शासनाचे धोरण आहे. परंतु आमच्याकडे प्रामुख्याने गरीब वस्तीतील विशेष मुलेच येत असल्यामुळे काही वयाने मोठ्या विद्याथ्र्यांचीही जबाबदारीही पालकांच्या विनंतीमुळे घेतल्याचे सातपुते यांनी सांगितले. अशी १८ वर्षांपासून ३३ वर्षापर्यंतची सहा विद्यार्थी असून त्यांनाही शिकविण्याचे काम आमचे शिक्षक प्रेमाने करतात, असे सातपुते यांनी सांगितले.

शिक्षक-पालक जिव्हाळ्याचा संवाद

शाळेच्या प्रयत्नांत पालकांनी समरसून सहभागी होणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही ‘मन की बात’ हा उपक्रमही राबवतो, असे भक्ती वाळवे यांनी सांगितले. यात शिक्षक पालकांशी संवाद साधतात. त्यांच्या व मुलांच्या अडचणी समजून घेतात. यातून मार्ग कसा काढायचा ते सांगतात. हा शिक्षक व पालकांमधील एक जिव्हाळ्याचा संवाद असून या विशेष मुलांच्या नियमित शिक्षणासाठी तो अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

टाळेबंदीत विशेष मुलांच्या शिक्षणासाठी काय करता येईल याचा विचार सुरू होता. पालकांची आर्थिक परिस्थिती पाहाता ऑनलाइन शिक्षण देता येईल का, हा प्रश्नच होता. त्यांच्याशी मोबाइलवर संवाद साधून विश्वाासात घेतले. मोबाइलच्या माध्यमातून मुलांना काही गोष्टी शिकवता येतील तसेच घरीच शाळा भरेल ही कल्पना मुलांच्या मनात रुजवली. त्यानंतर सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ४ अशी शाळेची वेळ नक्की केली.

– भक्ती वाळवे, गुरूकुल शिक्षण विभागाच्या प्रमुख