नवीन वर्षांत विधान परिषदेतील २२ सदस्य निवृत्त होत असून, त्यात सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते, तीन मंत्र्यांचा समावेश आहे. वरिष्ठ सभागृहात आपले संख्याबळ वाढविण्याकरिता भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेनेचे दोन उमदेवार निवडून येणे शक्य असल्याने या उभयतांनाच पुन्हा संधी दिली जाईल, अशी चिन्हे आहेत.
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. डॉ. पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. अमरावती परिसरात भाजपची चांगली ताकद असल्याने डॉ. पाटील यांना पुन्हा निवडून येण्यात अडचण येणार नाही.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या घटनात्मक पदांवरील तिन्ही नेत्यांची मुदत संपुष्टात येत आहे. परिणामी, पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला कोणीच पीठासीन अधिकारी पदावर नसेल.
यावर्षी निवडणूक होणारे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ पुढीलप्रमाणे – ठाणे, पुणे, सातारा-सांगली, यवतमाळ, नांदेड, जळगाव, गोंदिया-भंडारा. पदवीधर मतदारसंघ – नाशिक आणि अमरावती, शिक्षक मतदारसंघ – कोकण, नागपूर, औरंगाबाद. या मतदारसंघातून निवडून आलेले दहा सदस्य जुलैमध्ये निवृत्त होत
आहेत.
सुशीलकुमार शिंदे राज्यसभेसाठी इच्छुक?
राज्यसभेच्या सहा सदस्यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री पीयूष गोयल (भाजप), प्रफुल्ल पटेल आणि ईश्वरलाल जैन (राष्ट्रवादी), विजय दर्डा आणि अविनाश पांडे (काँग्रेस), संजय राऊत (शिवसेना) या सदस्यांची मुदत संपणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.