पालिकेच्या तपासणी अहवालात उघड

उन्हाच्या कडाक्यापासून सुटका करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरील स्टॉलवर लिंबू सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे रिचवत असाल तर सावधान! शहरात उघडय़ावर तयार केली जाणारी ही सरबते निकृष्ट दर्जाची असल्याचे पालिकेच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कुर्ला येथील लिंबू सरबत प्रकरणानंतर पालिकेने शहरातील २४ विभागांमधील लिंबू सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे विकणाऱ्या गाडय़ांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये १५६ बर्फाच्या गोळ्यांच्या गाडय़ांवरील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ९० टक्के गाडय़ांवर निकृष्ट दर्जाचा बर्फ वापरल्याचे तपासणीतून उघडकीस आले आहे, तर केवळ १५ गाडय़ांवर योग्य दर्जाच्या बर्फाचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी २२३ लिंबू सरबताच्या गाडय़ांची तपासणी करून २०४ नमुने पुढील चाचणीसाठी पाठविले होते. यामधील ७७ टक्के सरबताचे नमुने अयोग्य असल्याचे समोर आले आहे. पालिकेने २५४ उसाच्या रसवंतीगृहाची पाहणी केली होती. त्यातून २३६ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ९३ टक्के रसवंतीगृहामध्ये अयोग्य दर्जाचा रस असल्याचे या तपासणी अहवालात नमूद केले आहे.

पालिकेने तपासणी केल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या स्टॉलवरून हा साठा नष्ट केला आहे. पालिकेकडून पुढील काळात वारंवार अशा तपासण्या केल्या जातील. शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास २ हजार गॅस्ट्रोच्या रुग्णांची नोंद झाली आहे. अशा स्टॉलवर वापरले जाणारे पाणी दूषित असण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्टॉलवर सरबते किंवा रस यांचे सेवन करणे टाळून संसर्ग होण्यापासून स्वत:चे रक्षण करावे, असे पालिकेच्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केले.

पालिकेने या स्टॉलवरील साठा तात्पुरता नष्ट केला असला तरी या स्टॉलचालकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातही अनधिकृतपणे स्टॉल चालविणाऱ्यांची माहिती अतिक्रमण विभागाला कळवून प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. त्यामुळे अशा एक दिवसाच्या तपासणी मोहिमेतून शहरात गल्लोगल्ली ठाण मांडून बसलेल्या स्टॉलवरील निकृष्ट दर्जाच्या पेयपदार्थाच्या विक्रीवर मात्र कोणतेही र्निबध येणार नाहीत, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मांडले.