अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्रीनंतर गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनावरून झालेल्या वादवादीनंतर अल्टामाऊंट मित्र मंडळातील कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या नामनिर्देशित नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई कडक करावी, अन्यथा मुंबईतील जीवरक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा गिरगाव चौपाटी लाइफगार्ड असोसिएशनने दिला आहे. दरम्यान, काँग्रेस नगरसेवकाने हा आरोप फेटाळून लावला आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठय़ा प्रमाणात गणेश विसर्जन करण्यात येते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गिरगाव चौपाटी लाईफगार्ड असोसिएशनतर्फे विसर्जन सोहळ्याकरिता जीवरक्षक सेवा पुरवण्यात येते. येथे गुरुवारी विसर्जन सोहळा सुरू होता. मध्यरात्रीनंतर ३ च्या सुमारास अल्टामाऊंट मित्र मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी तराफ्याजवळ आणण्यात आली. त्यावेळी तराफ्यावर एका सर्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती ठेवण्यात आला होता.

अल्टामाऊंट मित्र मंडळाची गणेशमूर्तीच्या विसर्जनास विलंब होत होता. त्यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे नामनिर्देशित नगरसेवक सुनील नरसाळे यांनी जीवरक्षक सेवा पुरविणारे कंत्राटदार रुपेश कोठारी यांना जाब विचारला. यावेळी उभयतांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत झाले. नरसाळे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र संबंधितांविरुद्ध अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाही, असे रुपेश नरसाळे यांनी बुधवारी सांगितले.

आरोपांचे खंडन

पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा मुंबईमधील समस्त जीवरक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या वेळी असा कोणताही प्रकार घडलेला नाही. आपली बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असे स्पष्ट करीत सुनील नरसाळे यांनी आरोपाचे खंडन केले.