महाराष्ट्राने नेहमीच सहिष्णुतेची वेगळी परंपरा जपली आहे. येथे बहुभाषक मतदार आहेत. त्यामुळे केवळ भाषेच्या आधारे मतदान होत नाही आणि म्हणूनच येथे प्रादेशिक पक्षांच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत, असे सांगतानाच यापुढील काळातही प्रादेशिक पक्ष फार काही वाढण्याची शक्यता नाही, असे मत ज्येष्ठ मुत्सद्दी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

येत्या १२ डिसेंबर रोजी पवार यांच्या वयास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नवी दिल्लीतील त्यांच्या ‘६, जनपथ’ या निवासस्थानी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या दिलखुलास मुलाखतीमध्ये पवार यांनी देशाच्या राजकारणाचा अर्धशतकाचा पट उलगडून दाखविला. गतायुष्याकडे वळून पाहताना (पान १३ वर)

त्यांनी साहित्य, कला, संस्कृती, शेती, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमधील आपल्या वाटचालीवर प्रकाश टाकला.
आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनुसारच सर्व क्षेत्रांमध्ये वाटचाल केली व त्यात यशस्वी होत गेलो. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि अन्य वेळी सर्वाशी सुसंवाद ठेवायचा या यशवंतरावांच्या सल्ल्यानुसार वागत आलो. यामुळेच राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील सर्व नेत्यांशी अत्यंत उत्तम संबंध राहिले, असे पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांशी पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्याचे रहस्य अशा प्रकारे उलगडून सांगतानाच त्यांनी, राजकारणाच्या बदलेल्या पोताकडेही निर्देश केला. महाराष्ट्रातील राजकारणाची एक वेगळी संस्कृती आहे. तिला थोरामोठय़ांचे नैतिक अधिष्ठान होते. पण दुर्दैवाने देशातील वातावरणाचे राज्यावरही परिणाम झाले आणि सुसंवादाची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आली तसेच वैचारिक पातळी बदलली, अशी खंतही पवार यांनी या वेळी व्यक्त केली. मात्र राष्ट्रवादीबद्दल नेहमीच उलटसुलट चर्चा केली जात असली वा आरोप होत असले तरी राष्ट्रवादीला भवितव्य उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले.
अत्यंत मनमोकळेपणे दिलेल्या या मुलाखतीचा शेवट करताना पवार यांनी आपल्या अवघ्या राजकीय प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आयुष्य इतकं काही देईल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा मागे वळून पाहताना मनात निश्चितच समाधान आहे.. एक तृप्ती आहे.’’