मालाड येथे फेरीवाल्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची रविवारी राज ठाकरेंनी भेट घेतली. काल मनसेचे कार्यकर्ते मालाड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. यावेळी काही जणांनी माळवदे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. तसेच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये माळवदे गंभीर झाल्यामुळे त्यांना मालाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर राज ठाकरे त्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरु असल्याने राज ठाकरेंनी ही भेट पुढे ढकलली. दरम्यान, प्रकृती बिघडल्यामुळे  माळवदे यांना बोरिवलीतील ऑस्कर रूग्णालयात हलवण्यात आले होते. याच ठिकाणी आज राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. माळवदे यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते कालपासूनच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?
काल सकाळी माळवदे मालाड स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा निषेध करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह गेले असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून माळवदे यांना अटक केली. माळवदे यांना अटक आणि सुटका झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा ते स्थानकाबाहेर गेले. त्यावेळी फेरीवाल्यांच्या जमावाने माळवदे यांना जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये माळवदे यांच्या डोक्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते पुन्हा मालाड स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस व मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समजते. पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुंबईच्या अन्य भागांमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेनंतर दादर आणि मुलूंड परिसरातील फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळील फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड केली. प्लाझा चित्रपटगृहाबाहेरील फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड व नासधूस करण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या सर्वच मुख्य स्थानकांबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ठळक घडामोडी:

* मालाड पोलीस ठाण्यात संजय निरुपम यांच्याविरोधात चिथावणीचा गुन्हा दाखल
* मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी ७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
* सुशांत माळवदे यांची विचारपूस करण्यासाठी राज ऑस्कर रुग्णालयात
* राज ठाकरे कांदिवलीत दाखल; मनसेच्या जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस