रूळाला तडा गेल्यामुळे मंगळवारी संध्याकाळी हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, काहीवेळापूर्वीच रूळाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. मात्र, अद्यापही हार्बर रेल्वेमार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. आज संध्याकाळी सातच्या सुमारास या मार्गावरील वडाळा स्थानकानजीक रूळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्या प्रचंड उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळेत हा बिघाड झाल्याने घरी परतणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यानच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळता यावी यासाठी वडाळा स्थानकातून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वरून सोडल्या जात होत्या. सध्याच्या माहितीनुसार या मार्गावरील गाड्या तब्बल १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेमार्गावरील कल्याणजवळ रूळाला तडे गेल्यामुळे लोकल गाडीचे पाच डबे घसरले होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तब्बल ११ तास मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. गेल्या तीन वर्षांत मध्य रेल्वेवर रूळाला तडे जाण्याच्या १३९ घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवर रुळांना तडे जाण्याच्या घटना कमी घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेमार्गाजवळ किनारपट्टी आहे. त्यामुळे येथील हवामान खारे असते. त्याचा थेट परिणाम खडीवर होत असून खडीची झीज होते आणि त्यामुळे रुळांखालील गादी नाहीशी होते. त्याचप्रमाणे या खाऱ्या वातावरणामुळे रूळ लवकर गंजत असून त्यांना तडे जाण्याच्या घटना घडतात, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.