निर्बंधांत थोडी शिथिलता : सरकारी, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने

मुंबई : करोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्याने मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधाची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.

राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी नवे आदेश जारी केले. मुंबईचा गेल्या दोन आठवडय़ांतील संसर्ग दर (पॉझिटिव्हटी रेट) १.७६ टक्के, तर प्राणवायू खाटांच्या व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका आहे. ही बाब लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आठवडय़ातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत, तर औषधांची दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल मात्र पूर्वीप्रमाणेच दुपारी ४ वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत.

तरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य खेळ आठवडय़ाचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रिकरणासही नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आली आहे.

निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मुखपट्टीचा वापर, अंतर नियम आणि अन्य प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावेच लागणार आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशांमध्ये देण्यात आला आहे.

सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मुंबई, ठाण्यात रेल्वे सेवेचा वापर करण्यास सर्वसामान्यांना परवानगी नसल्याने कर्मचारी कार्यालयांमध्ये येणार कसे, हा कळीचा मुद्दा आहे. रेल्वे सेवा सुरू नसल्याने १०० टक्के  कर्मचाऱ्यांची उपस्थिती अशक्यच आहे.

करोना रुग्णसंख्या अधिक असलेले ११ जिल्हे वगळता अन्य जिल्ह्य़ांमधील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. सरकारी-खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने, त्याचबरोबर व्यायामशाळा, मॉल्स, सार्वजनिक उद्यानेही सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली.

उपाहारगृहे दुपारी ४ पर्यंतच खुली राहतील, तर धार्मिकस्थळे, सिनेमा आणि नाटय़गृहे बंदच राहणार आहेत. पुण्यासह ११ जिल्ह्य़ांमध्ये मात्र सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील.

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्य़ांमधील निर्बंध शिथिल करण्याचे सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. हे १४ जिल्हे वगळता अन्य २२ जिल्ह्य़ांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याचे मुख्य सचिव सीताराम कु ंटे यांनी जारी के लेल्या आदेशात स्पष्ट के ले आहे. मुंबई, ठाण्यातील निर्बंध किती शिथिल करायचे याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. त्यानुसार मुंबई महापालिकेने सोमवारी आदेश जारी केले.

११ जिल्हे निर्बंधांतच :

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्य़ांतील निर्बंध कायम राहतील. या जिल्ह्य़ांमध्ये सध्याच्या नियमानुसार दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली राहतील. तसेच मॉल्स बंद राहतील. तिसऱ्या स्तराचे निर्बंध या जिल्ह्य़ांमध्ये कायम असतील. त्यांना कोणत्याही नव्या सवलती दिलेल्या नाहीत. ११ जिल्ह्य़ांच्या यादीतील सिंधुदुर्ग, सातारा आणि नगर या तीन जिल्ह्य़ांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त असल्याने तेथे कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

‘डेल्टा प्लस’वर कोव्हॅक्सिन परिणामकारक

हैदराबाद : करोनाच्या डेल्टा प्लस (एवाय.१) या नव्या उत्क्रांत विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस परिणामकारक असल्याचा भारतीय वैद्यकीय आणि संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अभ्यासातील निष्कर्ष आहे. कोव्हॅक्सिन (बीबीव्ही१५२) या लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर डेल्टा, डेल्टा एवाय.१ आणि बी.१.६१७.३. या करोना विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते, असे ‘आयसीएमआर’च्या अभ्यासात म्हटले आहे.

हे बंदच..

’सिनेमागृहे, नाटय़गृहे, मल्टीप्लेक्स. सर्व प्रकारची धार्मिकस्थळे.

’शाळा आणि महाविद्यालये. शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश त्यांना लागू असतील.

’राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्र म, निवडणूक प्रचारसभा, निषेधसभा, निदर्शने, मोर्चे, वाढदिवसाचे कार्यक्र म.

’रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत घराबाहेर फिरण्यावर निर्बंध.

उपाहारगृहांना वाढीव मुभा नाही

दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या असल्या तरी उपाहारगृहांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. प्रचलित वेळेनुसार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के  क्षमतेने उपाहारगृहे सुरू ठेवता येतील. घरपोच सेवेसाठी रात्रीपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांची वेळ रात्री १० पर्यंत वाढविण्याची संघटनेची मागणी होती.

कोणते निर्बंध शिथिल?

’मुंबईत सर्व दुकाने सर्व दिवस रात्री १० पर्यंत खुली राहतील. राज्यात मॉल्स सुरू करण्यास परवानगी.

’सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. प्रवासातील गर्दी टाळण्याकरिता वेळा विभागून देण्याची सूचना. व्यायमासाठी उद्याने, क्रीडासंकुले खुली ठेवण्यास परवानगी.

’व्यायामशाळा, योग केंद्रे, के शकर्तनालये, ब्यूटीपार्लर, स्पा वातानुकू लित यंत्रणा न वापरता सोमवार ते शुक्र वारी रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी. शनिवारी दुपारी ३ पर्यंत तर रविवारी बंद.

’मालाची वाहतूक, कृषी संबंधित व्यवहार, बांधकाम क्षेत्र, औद्योगिक कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा.

रेल्वे सेवेसाठी प्रतीक्षाच! 

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महानगर क्षेत्रात रेल्वे सेवेचा सर्वसामान्यांना वापर करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. परंतु नव्या आदेशात रेल्वे सेवेबद्दल काहीही उल्लेख नाही. सर्वसामान्यांना लगेचच रेल्वे सेवेचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे संके त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परवानगी दिल्यास रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांच्या कृतिदलाने व्यक्त के ली होती.