कामगार नसल्याने व्यवसायावर परिणाम, टाळेबंदीमुळे विक्रीतही घट

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : उपनगराच्या वेशीवर मुलुंड आणि भांडुपदरम्यान असलेल्या मिठागरांचे कामगारांअभावी उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. त्याचवेळी वाहतुकीस असलेले र्निबध आणि त्यासाठीचा मजूर वर्ग उपलब्ध नसल्याने विक्रीदेखील खुंटली आहे.

मुलुंड आणि भांडुप येथे खाडीच्या किनाऱ्यावर सुमारे ७०० एकर जागेत मिठागरे आहेत. येथील मिठाचा वापर हा फक्त औद्योगिक क्षेत्रासाठी केला जातो. खाण्यासाठी हे मीठ वापरले जात नाही. दरवर्षी सुमारे आठ हजार टनच्या आसपास मिठाची शेती केली जाते. मात्र यंदा हे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाल्याचे संबंधितांनी सांगितले.

पावसाळा संपल्यावर दिवाळीनंतर मिठाच्या शेतीला सुरुवात होते. जमीन तयार करणे, खाते पाडणे अशी कामे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जातात. यासाठी काम करणारे मजूर हे पालघर परिसरातून येतात. तेथील आदिवासी हे या पारंपरिक कामात पारंगत आहेत. मिठाच्या शेतीची पूर्वतयारी झाल्यावर पाणी साठवून मग होळी साजरी करायला हे सर्व मजूर आपल्या गावी परत जातात. त्यांची ही सुट्टी किमान १५ दिवसांची असते. या वर्षी ९ मार्चला होळी होती आणि २० मार्चपासूनच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी र्निबध सुरू झाले. त्यापूर्वी जितके मजूर परत आले तेवढेच सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत.मुलुंड-भांडुप दरम्यानच्या मिठागरांवर सुमारे १२५ मजूर एरवी कार्यरत असतात, मात्र यावेळी ही संख्या निम्म्यावर आली आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. सर्वसाधारणपणे १५ मार्चपासून मीठ तयार होऊ लागते आणि गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून मीठ बाहेर काढणे आणि विक्रीला सुरुवात होते. मात्र यंदा हा मुहूर्त हुकला आहे.

मीठ ट्रकमध्ये चढवणे व इतर आनुषंगिक कामे करण्यासाठीचे मजूर हे वेगळे असून ते मुख्यत: देशावरून येतात. टाळेबंदीत प्रवासावरील र्निबधांमुळे ते मजूर देखील येथे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे या वर्षी येथील मिठाची विक्रीच झाली नसल्याचे संबंधितांनी सांगितले.