उमेदवारीवरून नाराजी नाट्याचे लोण शिवसेनेतही आल्याचे दिसते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याविरोधात काही शिवसैनिक तक्रार घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. आनंदराव अडसूळ यांना पुन्हा एकदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिलेली उमेदवारी काही शिवसैनिकांना रूचलेली दिसत नाही.  या शिवसैनिकांनी अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगण्यात येते. अडसूळ यांनी आजच (सोमवार) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

यापूर्वीही उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर नाराज गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. मोठ्याप्रमाणात नाराज शिवसैनिक मातोश्रीवर जाण्यास निघाले होते. परंतु, त्यांना पोलिसांनी आधीच रोखले. हा वाद शमतो ना शमतो. तोवर अमरावती मतदारसंघातील अडसूळ यांच्या विरोधात शिवसैनिक उतरल्याने पक्षासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता यवतमाळ मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार भावना गवळी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तिथे भाजपाच्या एका नेत्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.