|| शुभांगी गोखले

मोदींच्या निर्णयामुळे अचानक सगळीक डे बेरोजगारी निर्माण झाली वगैरे मुद्दे पटणारे नाहीत. उलट, नरेंद्र मोदी हे अत्यंत संवेदनशील आणि तळागाळातून वर आलेले व्यक्तिमत्त्व असल्याने सर्वसामान्यांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. पाच वर्षांत सगळ्या समस्या सोडवणे शक्य नाही, पण त्यांनी ते करून दाखवले. मोदींचे धोरण आपण अनुभवले आहे. ते लोकांना वाटेल तसे बोलू देतात. मात्र, योग्य तो निर्णय घेऊन एका रात्रीत त्यांनी काय काम केले आहे हे ते लोकांसमोर ठेवतात. त्यामुळे आता त्यांना पुढची पाच वर्षे काम करण्यासाठी मिळालेली असल्याने निश्चितच या समस्या सुटतील असा विश्वास वाटतो.

आजचा निकाल हा आनंददायी आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचार करता माझ्यासाठी, माझ्यासारख्या देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी  सरकार काम करेल, अशी निदान आशा वाटेल. ज्यांचे काम प्रत्यक्ष लोकांना दिसलेले आहे, अशा सरकारचा विजय झालेला आहे.

आधीच्या सरकारने काहीही काम केलेले नाही, असे काही म्हणायचे नाही आहे; पण आत्तापर्यंत ज्या तुंबलेल्या गोष्टी होत्या, मग ते जनतेचे पैसे असोत किंवा त्यांच्या समस्या असोत, त्यावर कुठे तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेली कामे आणि काम करण्याची पद्धत पाहता जनतेला सहज संवाद साधता येईल, संपर्क  करता येईल असे हे सरकार असल्याची प्रचीती लोकांना आली आहे. शासकीय यंत्रणा आणि त्यांची कामेही सुरळीत झालेली पाहायला मिळाली. आपण मेट्रो शहरांमध्ये राहतो. त्यामुळे हा बदल चटकन लक्षात येत नाही, गावपातळीवर मात्र लोकांना हा बदल स्पष्टपणे दिसलेला आहे.

सत्ता हातात आल्यानंतर फक्त पाच वर्षांत इतक्या धडाडीने काम करणारे, सगळ्याच बाबतीत चौकस असलेले असे हे सरकार आहे, हे त्यांनी वेळोवेळी जाणवून दिले. आत्मकेंद्री आणि प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दूषणे देण्याची छान सोय काँग्रेसने त्यांच्या काळात करून ठेवली होती, कारण त्या वेळी प्रचंड भ्रष्टाचार घडलेला होता.  सरकार म्हणजे कोणी तरी शत्रूच आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. त्यापेक्षा सरकार हे आपले आहे, आपण निवडून दिलेले आहे, ही सरकारविषयी मित्रत्वाची भावनात जनतेत नरेंद्र मोदी यांनी रुजवली. उगीचच कोणी कोणाचे भक्त होत नाही. मोदी आपल्यासाठी नक्कीच काही तरी करतील आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी, नेते हेही त्या पद्धतीनेच काम करण्यास सक्षम आहेत हा विश्वास त्यांनी जनतेला दिल्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे.

या सरकारवर अनेक टीका झाल्या, मात्र त्यात प्रामुख्याने सीमेवरचा प्रश्न पाहिला तर पंतप्रधान म्हणून मोदींनी स्वत: नियोजन करत धडाडीने निर्णय घेतले, हे लोकांना आवडले. तोवर आपले सैन्य प्रतिकार करण्यासाठी सक्षम असतानाही त्यांना कधी तसे आदेश दिले गेले नव्हते. त्यामुळे अनेकदा सैन्याला नामुष्की पत्करावी लागल्याचेच आपण अनुभवले होते.

मोदी नसतील तर अन्य नेतृत्वाचे पर्याय काँग्रेस काय कोणाकडेच नाही. केवळ इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसते म्हणून प्रियंका गांधींना नेतृत्वाचा चेहरा म्हणून उभे करणे हा बालिशपणा होता. शिवाय, ज्या घरातच इतका मोठा भ्रष्टाचार आहे, त्यांचा जावई इतका गैरव्यवहारात अडकला आहे, हे पाहिल्यावर लोकांनी काय अपेक्षा ठेवावी?  ऐन निवडणुकीत ब्लँकेट्स वाटण्याचे दिवस गेले आता.. मोदीविरोधक अचानक म्हणायला लागले आहेत की, हे भयानक सरकार आलेले आहे, हुकूमशहाचे सरकार आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही लोकशाही नाकारत आहात. आपण त्यांना निवडून दिलेले आहे. जनतेने कौल दिल्यामुळे ते निवडून आले आहेत आणि जो सत्तेवर येतो त्याची ताकद, त्याची निर्णयक्षमता ही इतरांपेक्षा जास्त असणारच. इथे गैरप्रकार झाले आहेत, जातीधर्माची दुही वाढणार, असे काही म्हणणे योग्य ठरणार नाही. जनतेचा कौल हा प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, एक दिवस असा येईल जेव्हा देशभरात कमळं फुलतील. आज तो दिवस आहे..!

(लेखिका अभिनेत्री आहेत)