कार्यक्रमानिमित्त संगीताची बहारदार मैफल

मुंबई : उद्योगापासून समाजसेवेपर्यंतच्या सर्वच क्षेत्रांत असीम कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता दुर्गा २०१९’ पुरस्कार सोहळा मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे रंगणार आहे.

विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या स्त्रियांचे कर्तृत्व समाजापुढे यावे, या हेतूने ‘लोकसत्ता दुर्गा’ हा विशेष उपक्रम नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

या उपक्रमांतर्गत या वर्षी वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था काढून हजारो मुलांसाठी आधारवड बनलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, मेळघाट येथे राहून आदिवासींच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. कविता सातव, विविध सामाजिक संस्थांना दानशूर लोकांपर्यंत पोहोचवून कोटय़वधी रुपयांचे दान मिळवून देणाऱ्या वीणा गोखले, वाळूमाफियांना सळो की पळो करून सोडणाऱ्या तडफदार तहसीलदार शिल्पा ठोकडे, लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले, समाजातील कुप्रथा, बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि जातपंचायतींच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅड. रंजना गवांदे, अनेक विक्रम करणाऱ्या ‘सागरकन्या’ रुपाली रेपाळे, एचआयव्ही-एड्सग्रस्त मुलांच्या आई झालेल्या मंगलताई शहा आणि मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ थाटणाऱ्या नंदिनी बर्वे यांना नऊ मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्यात दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने साहित्य, संगीताची बहारदार मैफलही अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल.

कार्यक्रमाचे प्रायोजक

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

 पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि.,

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

 टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा