टाळ्यांचा अव्याहत कडकडाट आणि शिटय़ांचा दणदणाट.. असेच वातावरण शनिवारी रवींद्र नाटय़मंदिरातील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटरमध्ये होते. निमित्त होते ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संगीतबारीच्या प्रयोगाचे! रसिकांच्या तुफान प्रतिसादामुळे उत्तरोत्तर रंगत mu05गेलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी ‘लोकसत्ता’च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरमधील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटरमध्ये ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाअंतर्गत संगीतबारीचा प्रयोग सादर झाला. या वेळी कलावंतांनी सादर केलेल्या लावणीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कलावंतांच्या नृत्य अदाकारीने बहरलेल्या या कार्यक्रमाला रसिकांच्या शिटय़ा आणि टाळ्यांनी रंगत आणली. मुख्य कार्यक्रमापूर्वी ‘लोकसत्ता’चे फिचर एडिटर रवींद्र पाथरे यांनी शकुंतलाबाई नगरकर आणि मोहनाबाई महाळंग्रेकर यांच्याशी संवाद साधला.
निर्माते अजित भुरे यांच्या ‘ट्रस्ट द थेस्पियन’तर्फे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे दिग्दर्शन सावित्री मेधा सुद व लेखन भूषण कोरगावकर यांचे होते. या कार्यक्रमामागील ‘लोकसत्ता संपादक शिफारशी’ची भूमिका स्पष्ट केली. अजित भुरे म्हणाले की, संगीत बारी या कलाप्रकारातील हे कलाकार मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागांतील रसिकांना माहिती व्हावेत, त्यांची ही कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यायोगे या कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावे आणि मदतही मिळावी हा उद्देश ठेवून आपण या कार्यक्रमाची निर्मित केली आहे. भूषण कोरगावकर यांनी लावणी या कला प्रकारात अभिजात कलेचे सामथ्र्य आहे, असे सांगितले. तर मेधा सुद म्हणाल्या, संगीतबारी वास्तव आणि यातील कलाकार यांना प्रेक्षकांसमोर आणण्याचा आणि यापूर्वी कधीही न ऐकलेली लावणी सादर करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुंबईतील सुजाण, सुसंस्कृत रसिकांसमोर संगीतबारी सादर करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. या कलाक्षेत्रात आमच्यासारखेच इतरही अनेक गुणी कलावंत आहेत, त्यांनाही ‘लोकसत्ता’ ने असेच व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.
– शकुंतलाबाई नगरकर आणि मोहनाबाई महाळंग्रेकर, संगीत नाटक पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ लावणी कलावंत