होळीचा सण जवळ आलाय आणि सर्वाना वेध लागले आहेत पुरणपोळीचे. पण या होळीच्या सणाला तुम्हाला पारंपरिक स्वादाच्या पुरणपोळीपेक्षा वेगळ्या चवीची पुरणपोळी चाखायची असेल तर ती एका क्लिकवर घरपोच मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी पुरणपोळी ऑनलाइन डॉट.कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून डोंबिवलीच्या सौरभ दहिवदकर या तरुणाने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. मराठी पदार्थ म्हटला की पहिलं नाव पुरणपोळीचं येतं. त्यामुळे हा पदार्थ सर्वांपर्यंत पोहोचायला हवा असं सौरभला वाटतं. पण सर्वानाच गोड पदार्थ आवडत नाहीत. त्यामुळे वेगळे फ्लेवर्स आणि चवीच्या पुरणपोळ्या बनवण्याची संकल्पना सौरभला सुचली.

सौरभने १४ फेब्रुवारी २०१६ रोजी पुरणपोळी ऑनलाइन डॉट कॉम ची सुरुवात केली. आंबा आणि स्ट्रॉबेरीपासून सुरुवात करत आज सौरभकडे वेगवेगळ्या २१ फ्लेवर्सच्या पुरणपोळ्या मिळतात. त्यामध्ये आंबा, बदाम-पिस्ता, स्ट्रॉबेरी, संत्र, मोसंबी, चीज, पान मसाला, पान शॉट, ब्लूबेरी, ब्लॅक करंट, शेझवान यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व फ्लेवर्सची फूड लायसन्स त्याच्याकडे आहेत. या फ्लेवर्सशिवाय अजून पंधरा नवीन फ्लेवर्स सौरभकडे तयार असून त्याची लायसन्स हाती आल्यावर लवकरच खवय्यांना ते चाखायला मिळणार आहेत.

सौरभने इंजिनीअरिंगची पदवी घेतली असून सध्या तो एम. बी. ए. करतोय. एवढंच नव्हे तर जूनमध्ये  पीएच.डी. साठीसुद्धा अर्ज करणार आहे. २०१३ ते २०१५ या काळात महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी केल्यानंतर सौरभने काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतला. वैयक्तिक आयुष्यात तो दानाला खूप महत्त्व देतो. त्यातूनच त्याने सात ते आठ मुलांचं पालकत्व स्वीकारलं असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च तो करतो. नोकरी सोडल्यावर नवीन काय करायचं हा प्रश्न सौरभसमोर होता. पण फूड इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करण्याचा त्याचा मानस होता. कारण फूडमध्ये नवीन काहीही दिलं तरी लोक ते स्वीकारतात हे त्याने पाहिलेलं होतं. पुरणपोळीच्या प्रयोगात सौरभला डोंबिवलीच्याच एक काकू मदत करत आहेत. त्याच प्रमुख शेफ असल्याने सध्या तो त्यांचं नाव जाहीर करू इच्छित नाही. सुरुवात करण्याआधी त्यांनी तब्बल दोन महिने वेगवेगळ्या फ्लेवर्सवर काम केलं. हा प्रयोग लोकांना आवडेल याची त्यांना खात्री पटल्यावरच त्यांनी बाजारात उतरायचं ठरवलं.

पुरणपोळी ऑनलाइन डॉट कॉमच्या कामासाठीही त्याने वृद्धाश्रमातील महिलांना रोजगार दिला आहे. त्यातून त्यांना विरंगुळाही मिळतो. तज्ज्ञांमार्फत गरजू महिलांना फ्लेवर्ड पुरणपोळ्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. सध्या पाच महिलांना यातून रोजगार मिळत असून कामाच्या व्यापासोबत ही संख्या वाढणार आहे.

काही पुरणपोळ्यांमध्ये खायचे रंग वापरावे लागत असले तरी ते हानीकारक नसतात. इथले काही फ्लेवर्स खास मधुमेहींसाठी तयार केले जातात. तसंच फळांचा नैसर्गिक गर त्यामध्ये वापरला जातो. पुरण तयार झाल्यावर त्यामध्ये हव्या त्या फळांचा गर टाकला जातो. त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. पण फक्त गर टाकून त्याला चव येत नाही. इतरही अनेक गोष्टी टाकल्या जातात. व्यवसायाचं गुपित असल्याने त्या इथे सांगता येणार नाहीत. पण काही प्रिझर्वेटिव्हज् ते स्वत: तयार करतात. ज्यामुळे कडवटपणा नाहीसा होतो आणि पुरणपोळ्यांचं आयुष्यही वाढतं. पुरणपोळ्या हाताने लाटूनच तयार केल्या जातात. मोठय़ा तव्यावर भाजल्या जातात. तर पॅकिंगसाठी खास जर्मनीवरून मशीन मागवलेलं आहे. त्यामुळे बंद पाकिटातली पुरणपोळीही दहा ते बारा दिवस टिकते.

तुम्हाला होळीसाठी वेगळ्या फ्लेवरच्या पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर सोमवापर्यंतच ऑर्डर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे थोडी घाई करावी लागेल. ऑनलाइन ऑर्डरसाठी कमीतकमी दहा पुरणपोळ्या मागवणं गरजेचं आहे. एक फ्लेवर पुरणपोळी ३० रुपयांना आणि नेहमीची पुरणपोळी २५ रुपयांना मिळते. पन्नासहून अधिक पुरणपोळ्या मागवल्या तर सूटही दिली जाते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये डिलिव्हरीची सोय उपलब्ध आहे. मुंबईबाहेरही आणि परदेशातही पुरणपोळी पाठवण्याची सोय त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

– प्रशांत ननावरे

nanawareprashant@gmail.com

@nprashant