25 February 2020

News Flash

शेतीसाठी शेतकऱ्यांची दुसरी पिढी उभी करण्याचे आव्हान!

कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे प्रतिपादन

कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे प्रतिपादन : ‘लोकसत्ता’ला खास मुलाखत

आपल्या देशातील शेती व्यवसायाकडे केवळ अन्नसुरक्षेचा स्रोत म्हणून पाहिले जात नाही, तर शेती ही उपजीविकेची सुरक्षित अशी व्यवस्थाही आहे. त्यामुळे तेथे उत्पादकतेपेक्षाही आर्थिक उत्पन्नाला अधिक महत्त्व असून, शेतमालाच्या किमतीचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे करणे आवश्यक आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांची दुसरी पिढी तयार न होणे ही आजची देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी संशोधक व हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आठव्या ‘इंडियन युथ सायन्स काँग्रेस’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत प्रो. स्वामिनाथन यांनी भारतीय कृषी व्यवस्था, संशोधन, सरकारी धोरणे अशा विविध मुद्दय़ांवर आपली अनुभवातून साकारलेली मते मांडली.

ते म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या ही दुर्दैवी बाब आहे. शेती हे जीवन देणारे माध्यम आहे. ते जीवन संपवणारे झाले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. प्रतिकूल आर्थिक स्थिती हे यामागील मुख्य कारण आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाला पोहोचतो.’’ अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकरिता जैवतंत्रज्ञानाने (बीटी)आणि वंशावळीत बदल (जीएम) करून निर्माण केलेल्या बियाण्यांच्या वापरास जबाबदार धरण्यात येत आहे. तसे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘‘शेतकरी आत्महत्या देशात सर्वच ठिकाणी होत आहेत. असे असताना केवळ बीटी आणि जीएम बियाण्यांचा वापर हा शेतकरी आत्महत्येशी संबंधित नसल्याचे माझे मत आहे. मात्र छोटय़ा शेतकऱ्याची नुकसान सहन करण्याची क्षमता खूपच कमी असते. बियाणे आणि तंत्रज्ञानावर त्याचे जास्त पैसे खर्च झाले तर त्यांचा धोका त्या प्रमाणात वाढतो; परंतु जीएम बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असे सरसकट म्हणता येणार नाही. त्यासाठी फायदा-तोटय़ाचा प्रत्येक शेतानुसार अभ्यास होणे अपेक्षित आहे.’’

सरकारच्या सध्याच्या कृषी धोरणांबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ‘‘नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने कृषी विकासासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. सरकारने अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असा विचार करून काही योजना आणल्या आहेत. यामध्ये मातीचे आरोग्य तपासण्याची सुविधा, एका दिवसाला जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी प्रोत्साहन, कर्जाच्या उपलब्धतेत वाढ याचबरोबर बाजारातील बदल अशा महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे; पण या सर्वात प्रमुख गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. उदाहरण म्हणजे मातीचे आरोग्य तपासण्याच्या योजनेत आपल्या देशातील मातीत जैविक पद्धतीने शेती कशी करता येईल यावर तातडीने विचार होणे गरजेचे आहे. निमशहरांमध्येही ‘एका थेंबात जास्त पिकं’ ही संकल्पना रूढ करणे आवश्यक आहे. छोटय़ा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना विशेष संरक्षण दिले पाहिजे. यासाठी किमतीचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचे करणे योग्य ठरणार आहे.’’

कंत्राटी शेती पद्धतीचा कृषी क्षेत्राला फायदाच होणार आहे, अशा शब्दांत या पद्धतीचे स्वागत करतानाच डॉ. स्वामिनाथन यांनी त्याबाबतचे काही धोकेही समोर आणले. ते म्हणाले, ‘‘ही पद्धती लागू करण्यापूर्वी त्यासाठीचा कायदा तयार केला पाहिजे. त्यात शेतकरी व मालक या दोघांच्या हिताचा विचार करून तरतुदी केल्या पाहिजेत. अन्यथा ही पद्धत शेतकऱ्यांच्या छळाचे कारण होऊ शकेल. देशात ५० टक्क्यांहून शेतमजूर या महिला आहेत.

या गटासाठी सरकारने काहीच भरीव केलेले नाही. महिला शेतकऱ्यांच्या नावावर किसान क्रेडिट कार्ड आहेत; पण त्यांच्या नावावर जमीनच नाही, अशी अवस्था आहे. यासाठी सरकारने सहकारी तत्त्वावर शेती कशी करता येईल यासाठी विचार करणे आवश्यक आहे. आज देशासमोर कोणती मोठी समस्या आहे, तर ती म्हणजे शेतकऱ्यांची दुसरी पिढी तयार होणे. देशातील तरुणांना चांगले काम मिळावे यासाठी सरकारने कौशल्य विकास योजना आणल्या आहेत. मात्र यामध्ये तरुणांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित होण्यासाठी विशेष काहीच केले नाही. या योजनेत सरकारने तरुणांना शेतीच्या आधुनिक पद्धती, अवजारांची दुरुस्ती अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले तर तरुण शेतीकडे वळेल. यासाठी कृषी विज्ञान केंद्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच हवामानबदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांकडे सरकारचे दुर्लक्ष दिसते. या क्षेत्रात संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. मात्र तसे झाले नाही.’’

सदाहरित क्रांती हवी!

हरितक्रांती हे उत्पादनावर आधारित एक संकल्पना आहे. मी सदाहरित क्रांतीला प्रोत्साहन देतो, जेणेकरून जैवविविधतेला धोका न पोहोचता उत्पादन वाढ होणे शक्य होईल. यासाठी जैवविविधतेच्या तत्त्वांना धरून तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार होणे आवश्यक आहे.   – स्वामिनाथन

First Published on February 16, 2017 12:48 am

Web Title: loksatta interview with m s swaminathan
Next Stories
1 मराठा आंदोलनात फुटीचा आरोप राजकीय हेतूने
2 आमदारांना यंदाही अर्थसंकल्पाच्या बॅगाच
3 ‘वक्ता दशसहस्रेषु’च्या समारोपास अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान
Just Now!
X