नवनवीन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

मुंबई : महाविद्यालयीन एकांकिकांचा पट हा मुंबई, ठाण्यातील ठरावीक महाविद्यालयांची मक्तेदारी म्हणून काल-परवापर्यंत ओळखला जात असे. गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून एकांकिकांचा रंगमंच गाजविताना अनेक होतकरू कलावंत दिसू लागले आहेत. राज्यभरातील महाविद्यालयीन वर्तुळात कमालीची लोकप्रिय ठरलेल्या लोकसत्ता ‘लोकांकिका’ स्पर्धेचा रंगमंच गाजविण्यासाठी यंदा अनेक नव्या महाविद्यालयांमधील कलाकार रंगभूमीवर पहिले पाऊल टाकण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.

महाविद्यालयीन नाटय़विश्वात मानाचे स्थान मिळविणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहाव्या वर्षांत पदार्पण करत आहे. दर्जेदार आशय, कसदार अभिनय, वैविध्य यामुळे स्पर्धेने नाटय़वर्तुळात वेगळा ठसा उमटवला आहे. स्पर्धेची उत्तरोत्तर लोकप्रियता पाहून राज्यभरातून काही महाविद्यालये लोकांकिकेत प्रथमच भाग घेत आहेत. परीक्षा, असाइनमेंटस याचे गणित सांभाळत विद्यार्थी सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास सज्ज झाले आहेत. अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण, आर्थिक मदत नसतानाही विद्यार्थी उत्साहाने लोकांकिकेत सहभागी होत आहेत. स्पर्धेचे आयोजन, दिग्गज नाटय़कर्मीची उपस्थिती, वेळोवेळी परीक्षकांचे मिळणारे मार्गदर्शन यामुळे ही स्पर्धा इतरांपेक्षा वेगळी ठरत असल्याचे मत या स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी व्यक्त करतात.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या आठ केंद्रांवर प्राथमिक, विभागीय अंतिम आणि महाअंतिम अशा तीन टप्प्यांत ही स्पर्धा रंगते.  मुंबईतील भवन्स महाविद्यालय यंदा लोकांकिका स्पर्धेत प्रथमच सहभागी होत आहे. ‘या स्पर्धेविषयी

मित्रांकडून ऐकून असल्याने यंदा सहभागी होण्याचे ठरवले. या स्पर्धेत सामाजिक , नागरी समस्यांना हात   घालणारे विषय पाहण्यास मिळतात,’ असे मत सांस्कृतिक प्रमुख जितेश नलावडे यांनी व्यक्त केले. देशभरात नावाजलेले माटुंग्यातील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीसुद्धा या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेत आहे. त्यामुळे येथे सध्या लोकांकिकेच्या ‘रसायना’ची चर्चा रंगली आहे.

 

राज्यभरातही उत्साहाचे वारे

महाविद्यालयात नाटकासाठी पोषक वातावरण नसतानाही महाविद्यालये एकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहेत. राजगुरुनगर येथील रत्नाई महाविद्यालय हे त्यापैकीच एक. त्यांच्या विद्यार्थ्यांचा अनुभव अत्यंत बोलका आहे. ‘आमच्या महाविद्यालयात नाटकास अनुरूप असे वातावरण नसतानाही आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करत आहोत. मातबर महाविद्यालयांच्या एकांकिका स्पर्धेत होणार असल्याने आपण कुठेही कमी पडू नये म्हणून जोमाने तालीम करत आहोत,’ असे मत निशा पंडित हिने व्यक्त केले.

स्पर्धेच्या वेळी तोंडावर आलेल्या परीक्षा, असाइनमेंटस यांसारख्या कारणांमुळे गेल्या वर्षी काही महाविद्यालयांना सहभागी होता आले नाही. परंतु या वेळेस महाअंतिम फेरीत मजल मारून सर्व कसर भरून काढणार आहेत. ‘लोकांकिकेत राज्यभरातील महाविद्यालये सहभागी होत असल्याने त्यामुळे उत्तम आशय, गुणवत्तेची खरी कसोटी लागते. म्हणूनच या स्पर्धेविषयी खूप उत्सुकता आहे,’ असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरद पैलवान याने सांगितले.  हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाला गेल्या वर्षी सहभागी होता आले नाही, परंतु यंदा लोकांकिका स्पर्धेविषयी समजल्यावर त्यांनी लगेच नावनोंदणी केली. या स्पर्धेची प्रक्रिया इतर स्पर्धासारखी नसल्याने विद्यार्थ्यांना ही स्पर्धा विशेष महत्त्वाची वाटते. एकांकिकेच्या सर्वच अंगांवर बारकाईने काम केले असल्याने प्राथमिक फेरीत त्याचा फायदा होईल, असा विश्वास केदार देसाई याने व्यक्त केला आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातून सहभाग

लोकांकिका स्पर्धेत मुंबई पुण्याबरोबरच ग्रामीण भागातूनही महाविद्यालये सहभागी होतात. पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नसतानाही केवळ दर्जेदार आशय, उत्कृष्ट मांडणी याच्या जोरावर स्पर्धेत बाजी मारतात. जालना, औरंगाबाद तसेच नाशिक येथील ग्रामीण भागातूनही महाविद्यालये प्रथमच लोकांकिकेत सहभागी होत आहेत. काही ठिकाणी महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहतात. तर काही ठिकाणी पुरेसे पाठबळ नसतानाही केवळ नाटकाच्या वेडापायी सहभागी होत आहेत. नागपूर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी एक ते दोन महिन्यांपासून तालमी करण्यात गुंतले आहेत. जालन्यातील एसआरटी महाविद्यालयात प्राध्यापकांचा सुद्धा पाठिंबा या विद्यार्थ्यांना मिळत आहे. नाशिक येथील एसव्हीकेटी महाविद्यालयातील तरुण कलाकार स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आहेत. तेथील प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या तालमीवर लक्ष ठेवत असून विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.

 

ठाणे, नवी मुंबईत उत्कंठा

यंदा ठाणे केंद्रातून तीन महाविद्यालये प्रथमच लोकांकिकेत सहभागी होत आहेत. कोपरखैरणे येथील लोकमान्य अभियांत्रिकी महाविद्यालय ‘सोप्पय बट अनएक्सक्टेड’ या एकांकिकेद्वारे पदार्पण करीत आहे. ‘यापूर्वी एकांकिका स्पर्धेत भाग घेतला नव्हता. मात्र ‘लोकसत्ताची’ ही मानाची स्पर्धा असल्यामुळे यंदा लोकांकिकेत सहभागी होण्याचे ठरवले. दडपण असले तरी अथक प्रयत्न करून आम्ही या स्पर्धेत यश मिळविण्याचा प्रयत्न करू,’ असे शुभम धाकोरकर या विद्यार्थ्यांने सांगितले. उरण येथील वीर वारजे महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांनी लोकांकिका स्पर्धेत भाग घेण्यास स्वत:हून विचारणा केली. ‘आमच्या महाविद्यालयात शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कला दाखवण्यासाठी लोकांकिका ही सुवर्णसंधी आहे,’ असे या महाविद्यालयातील ऋषिकेश भारती म्हणाला.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या साहाय्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ हे  असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावर कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.