‘मार्ग यशाचा’मध्ये डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेले विपुल ज्ञानभांडार आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत विकसित झालेल्या करिअरच्या संधींचा खजिना पाहता यातली नेमकी आपली वाट कोणती, याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचीच परिस्थिती असते. विविध क्षेत्रांतील या करिअरच्या वाटांची ओळख करून देणारा ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम मुंबईनंतर आता ठाणे आणि परिसरात दाखल झाला आहे. दहावी-बारावीनंतरच्या या नव्या शिक्षणवाटांची ओळख करून देणारा ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत आणि ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटक म्हणून पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे उपस्थित असतील. तर या दिवशी ‘लोकसत्ता’मधील ‘मनमोराचा पिसारा’ या सदराद्वारे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे हे मार्गदर्शन करतील.
विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि ललित कला या क्षेत्रांतील करिअरच्या वाटा दाखवण्यासाठी दोन्ही दिवस अनुक्रमे दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी हे वक्ते हजर असतील. तर विज्ञान शाखेतील नवनवीन करिअरच्या संधींबाबत माहिती देण्यासाठी बुधवार, २५ मे रोजी श्रीकांत शिनगारे आणि गुरुवार, २६ मे रोजी विवेक वेलणकर उपस्थित असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून करिअरसाठी कानमंत्र मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी साहित्यिक आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी हे उद्घाटक असतील, तर या दिवशी हरिश शेट्टी हे मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका ५० रूपयांच्या नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत.

प्रवेशिका येथे मिळतील
‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय ‘युक्ती’ तसेच पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन’, ‘अरेना अ‍ॅनिमेशन’, ‘एन. ए. एम. एस. शिपिंग मॅनेजमेंट प्रा. लि.’, ‘पारुल युनिव्हर्सिटी’, ‘गणपत युनिव्हर्सिटी’, ‘रोबोमेट’ आणि ‘सास्मिरा’ आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत. कार्यक्रमाची पन्नास रुपये शुल्काची प्रवेशिका टिपटॉप प्लाझा, लोकसत्ता ठाणे कार्यालय आणि in.bookmyshow.com  संकेतस्थळावर उपलब्ध असतील.

तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे
दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी (२५ आणि २६ मे)
श्रीकांत शिनगारे (२५ मे)
विवेक वेलणकर (२६ मे)

कधी?
बुधवार, २५ मे आणि गुरुवार, २६ मे रोजी
कुठे ?
टिपटॉप प्लाझा, ठाणे