लोकसत्ता वक्तादशसहस्रेषुस्पर्धा

लोकसत्तातर्फे आयोजित ‘लोकसत्ता वक्तादशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन  वक्तृत्त्व स्पर्धेच्या रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी गुरूवारी (९ फेब्रुवारी)  येथे रंगणार आहे.

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्य पातळीवरील स्पध्रेच्या तिसऱ्या पर्वाची नुकतीच सुरवात झाली असून पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ. मिरजगावकर्स आयसीडी (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट) औरंगाबाद, एमआयटी, औरंगाबाद आणि दि विश्वेश्वर को. ऑ. बँक लिमिटेड  यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.

या राज्यस्तरीय स्पध्रेतील रत्नागिरी विभागीय केंद्राची  प्राथमिक फेरी गेल्या ४ फेब्रुवारीला पार पडली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी त्यामध्ये भाग घेतला. प्रचलित राजकीय-सामाजिक परिस्थितीचे उत्तम भान दाखवणारे स्पष्ट विचार या स्पर्धकांनी व्यक्त केले. त्यातून आठजणांनी विभागीय अंतिम फेरी गाठली असून  त्यापैकी सात मुली आहेत. त्यांच्यातील वक्तृत्व गुणांचा कस उद्या लागणार आहे. या फेरीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला येत्या १७ फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात उद्या (९ फेब्रुवारी) दुपारी ४ वाजता विभागीय अंतिम फेरी होणार आहे. समाजकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित विषयांवर सखोल विचाराची मांडणी या स्पर्धकांकडून अपेक्षित आहे.  शिक्षण व कला क्षेत्रातील दिग्गज परीक्षक त्यांच्या या कौशल्याचे परीक्षण करणार असून प्रसिध्द अभिनेते वैभव मांगले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

untitled-8