तरुणाईला ज्येष्ठांकडून नेहमीच ऐकू येणारा टीकासूर आजच्या काळातही चुकला नाही. पण आधुनिक जीवनशैली अंगीकारलेली, तंत्र आणि गॅझेटसज्ज तरुणाई अंगभूत कौशल्यांच्या आयुधांसह विविध क्षेत्रांमध्ये तळपत आहे. समाजात आजवर सर्वार्थाने न पोहोचलेल्या तळपत्या युवाशक्तीमधील बारा खणखणत्या नाण्यांना ‘लोकसत्ता’ नव्या उपक्रमाद्वारे ‘तरुण तेजांकित’ म्हणून निवडणार आहे. दोन दिवसांनी जाहीर होणाऱ्या या तेजांकितांच्या नावांबाबत राज्यभर प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले आहे.

आजच्या तरुणांची नवनिर्मिती, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्याकडून समाजास मिळणाऱ्या ऊर्जेचे भरभरून कौतुक आणि या ऊर्जावंतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’उपक्रम सुरू केला आहे. शनिवार, ३१ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या शानदार सोहळ्यात निवडण्यात आलेल्या बारा तरुणांना ‘तरुण तेजांकित’पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. उद्योगपती बाबासाहेब कल्याणी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.

साहित्य-कलेपासून समाजसेवेपर्यंत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवून काम करणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. आपल्या कामाने, त्यामागील विचाराने त्या-त्या क्षेत्रालाही ते नवे आयाम देत आहेत. कोणी आपल्या नैपुण्याने कलाक्षेत्र गाजवीत आहे, तर कोणी सर्व कोलाहलापासून दूर राहून वैज्ञानिक प्रयोगशाळांत नवनवे शोध लावत आहे. ज्यांच्याकडे आस लावून पाहावे असे हे राष्ट्राचे वर्तमान आहे. त्या सर्वाचा संघर्ष, त्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी असून ते सर्वासमोर यावे हाही महत्त्वाचा उद्देश आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे यंदा पहिले वर्ष असून यापुढे दर वर्षी हा उपक्रम सुरू राहणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या चाळीस वर्षांच्या आतील तरुणांकडून ‘लोकसत्ता’ने स्वनामांकनपत्र मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वनामांकनपत्रे ‘लोकसत्ता’कडे आली. यातून अंतिम बारा तरुण तेजांकितांची निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊसकुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एलआयटी फायनान्स होल्डिंगचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता.

उपक्रमाची गरज..

मराठी लोकांना इतिहासात रमायला खूप आवडते. पूर्वीचे जे काही होते ते खूप चांगले असा गैरसमज आपणच कवटाळून बसलो आहोत. पण तो समज चुकीचा आहे. कारण आजच्या वर्तमानातही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक तरुण मंडळी आपापल्या परिने काम करत आहेत. त्यांचे हे काम इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही तरुणाई आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा समाजापुढे ठळकपणे आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केला आहे.