परिस्थितीशी टक्कर घेत, अडचणींचे डोंगर फोडत आणि नव्या वाटा धुंडाळत कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुणाईचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे तिसरे पर्व सुरू झाले आहे.

जिद्दीच्या जोरावर कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकणाऱ्यांपुढेही आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईच्या शोधाला प्रारंभ होत आहे.

विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. सर्जनशीलता आणि जिद्दीच्या जोरावर ते आपल्या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या-त्या क्षेत्रावर उमटला आहे. अशा तरुणाईला ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून थोरामोठय़ांकरवी कौतुकाची दाद मिळावी, त्याच्यातील सकारात्मकतेला वाव मिळावा, त्यांचा संघर्ष, यश समाजासमोर यावे हा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचा उद्देश आहे.

विविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यक्षेत्रात ठोस काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला गौरविण्यात आले.

लखलखते हिरे कोण?

नव्या लखलखत्या हिऱ्यांचे शोधपर्व सुरू झाले आहे. या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येतील. राज्यभरातून आलेल्या अर्जातून नामवंतांची समिती ‘तरुण तेजांकित’साठी तरुणांची निवड करणार आहे.

प्रेरणादायी यशकथांचा सन्मान

कोणी तंत्रज्ञानाच्या आधारे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणी मनोरंजनाच्या क्षेत्रात राहूनही सामाजिक भान जोपासत नवनिर्मितीची कास धरत आहे. नवउद्यमी हा आजच्या तरुणाईचा परवलीचा शब्द झाला असला तरी त्यातून ठोस कार्य करणारे अनेक तरुण आहेत. अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा संघर्ष, त्यांचे यश हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनेक तरुणांनी संघर्षांतून साकारलेल्या यशकथांचा सन्मान गेल्या दोन वर्षांत ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून करण्यात आला.

प्रायोजक

‘नवी पिढी काहीच करत नाही’, हा गैरसमज आपल्या दमदार कर्तृत्वाने पुसून टाकणाऱ्या तरुणाईच्या गौरवाचा हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.