तरुण म्हणजे ऊर्जा, वेगळं काहीतरी करण्याची धडपड! विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या अशाच हरहुन्नरी तरुणाईचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तरुण तेजांकितच्या दुसऱ्या पर्वात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या १४ तरुणांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये करण्यात आला.

विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या तरुणाईचा सन्मान करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. या उपक्रमांतर्गत प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या पण आपापल्या क्षेत्रात अथकपणे काम करणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणाईला हेरून त्यांचा सन्मान करण्यात आला. या १४  गुणवंतांच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. सर्वसामान्यांमधून निवडलेल्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. विज्ञान, कला, कायदा, सामाजिक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमधून तज्ज्ञ समितीने निवडलेल्या या कर्तबगार तरुणांचे कार्य जाणून घेण्यासाठी अनेक क्षेत्रांतील मान्यवरांमध्येही उत्सुकता होती.

तरुण तेजांकितचा हा दिमाखदार सोहळा सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘खयाल-ए-जॅझ प्रोजेक्ट’ या अनोख्या संगीत कार्यक्रमाने सर्वानाच ठेका धरायला भाग पाडले. आरोही म्हात्रे आणि रोंकीनी गुप्ता यांनी गायलेल्या शास्त्रीय आणि पाश्चिमात्य फ्युजन संगीताने या कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रसिद्ध गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी डॉ. काकोडकर आणि पं. कशाळकर या प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधला. कला आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ या संवादातून अनुभवता आला. त्यानंतर पं. कशाळकर यांनी गायलेल्या ‘राग वसंत’ने हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना मांडली. समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी दाखवण्याचे काम वर्तमानपत्रातून होतच असते, पण जे चांगले आहे त्याचाही सन्मान व्हावा याकरिता हा सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्धी झोतात असलेल्या नावांचा सन्मान होतच असतो, पण वेगळे काम करणाऱ्यांचे काम सर्वासमोर आणण्याचा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक क्षेत्रांतील कर्तृत्ववान तरुण गुणवंतांची निवड पाच मान्यवरांच्या तज्ज्ञ समितीने केली. या तज्ज्ञांचा यावेळी गिरीश कुबेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनबलगन, ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, संशोधक प्रियदर्शनी कर्वे आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या मान्यवरांचा समावेश होता. डॉ. काकोडकर, पं. कशाळकर आणि स्वानंद किरकिरे यांचा सन्मान ‘इंडियन एक्स्प्रेस समूहा’च्या प्रकाशक वैदेही ठकार यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यभरातून आलेल्या अर्जामधून पुरस्कारांसाठी प्रतिभावंतांची निवड करण्याचे शिवधनुष्य तज्ज्ञ समितीने पेलले होते. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक गुणवंतांच्या कामगिरीबाबतची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. या ध्वनिचित्रफितीची निर्मिती ‘रेजॉइस’चे वैभव बाबाजी यांनी केली होती. दूरदर्शनचे वृत्तनिवेदक विजय कदम यांच्या आवाजातून या ध्वनिचित्रफितीद्वारे गुणवंतांच्या कामगिरीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता चिन्मय पाटणकर यांनी लिहिली होती.

तरुण तेजांकित गुणवंतांचा सन्मान डॉ. काकोडकर, पं. कशाळकर तसेच ‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ  पाटील, ‘सारस्वत बँक’चे गौतम ठाकूर, रुणवाल ग्रुपचे संदीप रुणवाल, ‘सिडको’च्या प्रिया रातांबे, एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे रवींद्र सुळे, पीडब्ल्यूसीचे सुभाष पाटील, एमआयडीसीचे पी अनबलगन, परांजपे स्कीम्सचे अमित परांजपे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित मान्यवर

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेना खासदार अरविंद सावंत, ‘आयसीटी’चे गणपती यादव, सनदी अधिकारी डॉ. पी अनबलगन, तुकाराम मुंढे, ‘महारेरा’चे गौतम चॅटर्जी, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, सेंट जॉर्जचे डॉ. विवेक पाखमोडे, अभिनेते अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, अजित भुरे, आशुतोष कुलकर्णी, रोहन गुजर, ऋतुजा बागवे, प्रिया तेडोलकर, प्रतीक्षा लोणकर, दिग्दर्शक प्रतिमा जोशी, चंद्रकांत कुलकर्णी, ‘कलर्स मराठी’चे व्यवसायप्रमुख दीपक राजाध्यक्ष, प्रेमानंद गज्वी, गेल्या वर्षीचा तरुण तेजांकित राहुल भंडारे, शंतनू पाठक, ‘एनकेजीएसबी’ बँकेचे चिंतामणी नाडकर्णी, ‘आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड’चे अमित मांजरेकर, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चे संजीव नवांगुळ, ‘फिनिक्स एआरसी’चे अजय वाळिंबे.

या उपक्रमाचे टायटल पार्टनर ‘केसरी टूर्स’असून ‘सारस्वत बँक’, ‘रुणवाल ग्रुप’ आणि ‘सिडको’ हे असोसिएट पार्टनर होते. पॉवर्ड बाय पार्टनर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘लाईफ इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ हे होते. ‘पीडब्ल्यूसी’ हे या कार्यक्रमाचे नॉलेज पार्टनर असून ‘एमआयडीसी’ हे इव्हेंट पार्टनर, ‘परांजपे स्कीम’ हे रिअ‍ॅल्टी पार्टनर तर ‘एबीपी माझा’ टेलिव्हिजन पार्टनर होते.