घामाच्या धारा पुसत पावसाच्या सरींची वाट पाहत बसलेल्या मुंबईकरांचा रविवार पावसाने साजरा केला. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पडत आहे. या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाल्यास मान्सूच्या पुढील प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाने ढग स्वतसोबत नेले तर मान्सून राज्यात पोहोचण्यास वेळ लागू शकतो. याआधी केरळमध्ये रेंगाळलेल्या मान्सूनने महाराष्ट्रात पोचण्यास उशीर केला आहे. त्यात या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मान्सूनची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे परिसरात रविवारी सकाळपासून आभाळ भरून राहिलेले ढग व सोसाटय़ाचा वाऱ्याने पावसाची वर्दी दिली होती. त्यानंतर भर तप्त दुपारी टपटप वाजत आलेल्या पावसाने वातावरण गारेगार केले. मात्र मुंबईकरांना हवा असलेला हा मान्सूनचा पाऊस नसून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनाऱ्यावर सरी पडत आहेत. या क्षेत्राचे अतितीव्र स्वरूपाच्या पट्टय़ात रूपांतर होण्याची शक्यता असून ते गुजरातकडे सरकत आहे.
या पट्टय़ाचे वादळात रूपांतर झाल्यास मान्सूनच्या पुढच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. केरळच्या उंबरठय़ावर दहा दिवस अडून बसलेल्या पावसाने मंगलोपर्यंत मजल मारली, तरी त्यापुढे तो रेंगाळणार असल्याचा अंदाज वेधशाळेने रविवारीही मान्सूनच्या अधिकृत आगमनाची मर्यादा मंगलोरच्या पुढे सरकली नव्हती. मात्र तरी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार सरी आल्या. रणरणत्या उन्हात करपून निघत असलेल्या मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद घेत रविवार साजरा केला. ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरही मुसळधार सरी कोसळल्या. मात्र हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे वेधशाळेचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी मुंबईपासून ६५० किलोमीटर व वेरावळपासून ७०० किलोमीटर दूर असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेला गुजरातकडे सरकण्याचा अंदाज आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाल्यास मान्सूचा पुढील प्रवास मंदावण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ आजूबाजूच्या क्षेत्रातील सर्व ढग घेऊन गेल्यास मान्सून राज्यात पोहोचण्यास आणखी वेळ लागू शकतो. या बदलत्या स्थितीकडे सध्या हवामान खात्याचे लक्ष आहे. आधीच मान्सूनचे कमी प्रमाण अपेक्षित असताना आता या बदलामुळे मान्सूनची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर केव्हा होते?
समुद्रावर चक्राकार दिशेने ताशी ३१ ते ५१ किमी वेगाने वारे वाहत असल्यास त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. वाऱ्यांचा वेग ५२ ते ६१ किमी प्रति तास झाला की त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होते. वाऱ्यांचा वेग ६२ ते ८८ किमी प्रति तासावर पोहोचला की वादळ असल्याचे जाहीर केले जाते.

मान्सून केव्हा जाहीर करतात?
देशातील मान्सूनचे पहिले आगमन केरळमध्ये होते. १० मेनंतर केरळमधील १४ पैकी ६० टक्के पर्जन्यमापन केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिमी पावसाची नोंद होणे आवश्यक असते. त्याचसोबत हवेतील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याची दिशा व वेग निकषांनुसार असल्यास मान्सून आल्याचे जाहीर होते. त्यापुढील मान्सूनचा प्रवास निश्चित करण्यासाठीही याच तंत्राचा वापर केला जातो.