संदीप आचार्य

* आरोग्य विभागाची योजना तयार

* राज्यांत १८ जिल्ह्य़ांत प्रादुर्भाव

* देशात २१ राज्यांतील २५६ जिल्ह्य़ांत व्याप्ती

‘पोलिओ’प्रमाणेच देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केला असून याची दखल घेत महाराष्ट्रात आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रातून आगामी दोन वर्षांत हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्यात येणार असून आगामी दोन महिन्यांत हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या १३ जिल्ह्य़ांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

भारतात हत्तीरोगाचे मोठे आव्हान असून २१ राज्यांमधील २५६ जिल्ह्य़ांमध्ये त्याची व्याप्ती आहे. डासांच्या माध्यमातून शरीरात परोपजीवी जंतूंची निर्मिती होऊन हात व पाय सुजतात. महाराष्ट्रातही नागपूर, गडचिरोली, चंद्रपूरसह १८ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी नोव्हेंबर व फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यात व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. तसेच यात इव्हरमेकटिन, डायइथिल कार्बाझाईन व अल्बेंडोझोल (आयडीए) ही तीन परिणामकारक औषधे देण्यात येणार आहेत. राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी २००४ पासून वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या असल्या तरी यात दोन प्रकारची औषधे देण्यात येत होती. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार तीन औषधांचे डोस देण्यात येणार आहे. यापूर्वी गडचिरोलीत आयडीएचा प्रयोग करण्यात आला होता.

अशी असेल मोहीम

आगामी दोन महिन्यांत हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या तेरा जिल्ह्य़ांत सहा सर्वेक्षण पथक, १६ नियंत्रण पथके, ३४ रात्रकालीन चिकित्सालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या वर्षी १५ ते ३० जुलै या काळात राज्यात हत्तीरोग शोधमोहिमेत हत्तीरोगाची बाह्य़ लक्षणे असलेले ३४,०६४ रुग्ण आढळले, तर अंडवृद्धीचे १९,०६० रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. २०१७ मध्ये हत्तीरोगाच्या रुग्णांची संख्या ४०,२०४ एवढी होती. राज्यात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, अकोला या जिल्ह्य़ांत या रुग्णांची संख्या मोठी असून रात्रकालीन चिकित्सालयाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रक्त तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. भोई यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाकडून हत्तीरोग उच्चाटनासाठी मदतही मिळणार आहे.

ज्यांना या रोगाची लागण झाली आहे त्यांना रोग आटोक्यात ठेवण्यासह आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. पोलिओप्रमाणेच हत्ती रोग निर्मूलनासाठी देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीही अलीकडेच दिल्लीत हत्ती रोग निर्मूलनासाठीच्या राज्याच्या आराखडय़ाचे सादरीकरण केले होते.

– डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक