News Flash

‘प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही’, नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन!

पहिल्याच पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांचा आश्वासक सुरुवात करण्याचा प्रयत्न!

संग्रहीत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी प्रकरणी आरोप झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरणापासून ते परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बपर्यंत घडलेल्या घडामोडींमुळे पोलीस दलाविषयी मोठ्या प्रमाणावर अविश्वास निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये “पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत”, असं ते म्हणाले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात!

दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. “उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असं ते म्हणाले.

काळ आव्हानात्मक आणि अवघड…

सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी मान्य केलं. “काळ आव्हानात्मक आणि अवघड आहे. करोनामुळे सर्व पोलीस दल रस्त्यावर किंवा फील्डवर कार्यरत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच करोना काळातल्या बंधनांची अंमलबजावणी करणं ही जबाबदारी देखील पोलीस विभागावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी आहे. हे दिवस त्या त्या धर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत. करोनाचा अंदाज पाहिला, तर या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील”, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी ‘विकेट’ पडणार”; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

माहितीसाठी नवी यंत्रणा उभारणार!

वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासासाठीची माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा मानस असल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. “या पुढील काळात धोरणात्मक बाबींविषयी प्रश्न विचारावेत. छोट्या-मोठ्या तपासांबाबत प्रश्न विचारले जातात. त्यासाठी स्वतंत्र यंत्रण तयार करण्याचा मानस आहे. त्या माध्यमातून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल”, असं त्यांनी सांगितलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वरीष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप लावले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतील पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे निर्देश दिले होते, असं परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 2:43 pm

Web Title: mah home minister dilip walse patil first press conference after anil deshmukh resign pmw 88
Next Stories
1 अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 करोना लसीकरणासाठी वयोमर्यादेचं बंधन नसावं : राज ठाकरे
3 परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढतीये – राज ठाकरे
Just Now!
X