पावसाने दगा दिल्याने राज्यावर, विशेषत: मराठवाडय़ावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली आहे. त्यानुसार राज्यात सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडलेल्या १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये कृषी पंपांच्या वीज बिलांमध्ये ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ आणि सारामाफी या सवलती दिल्या जाणार आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अजून पाऊसच झालेलाच नाही. या भागातील पेरण्या वाया गेल्या असून पिण्यासाठीही पाणी नाही. त्यामुळे कमी पाऊस झालेल्या भागात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याची मागणी मराठवाडय़ातील मंत्र्यांनी गेल्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यावेळी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागास दिले होते. त्यानुसार बुधवारच्या बैठकीत अहवाल मांडण्यात आला. टंचाईसदृश स्थिती जाहीर करताना जिल्हा हा निकष घटक न मानता तालुका हा घटक निकष मानण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ६८.५० टक्के  पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर गेला आहे. तर गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ७३ टक्के होता. मराठवाडय़ांमधील सर्व धरणांमध्ये मिळून केवळ १९ टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, िहगोली, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ या ११ जिल्ह्य़ांत ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून त्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाडय़ातील ७६ तालुक्यांपैकी केवळ लातूर तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

* २६ ते ५० टक्के : औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड.
* ५१ ते ७५ टक्के : रायगड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, वाशिम, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, अहमदनगर.
* ७६ ते १०० टक्के : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया
* १०० टक्क्यांपेक्षा जास्त : पुणे, ठाणे, सातारा, सांगली.

८७% पेरण्या पूर्ण
धरणांतील पाणीसाठा
मराठवाडा    १९%
कोकण        ८९%
नागपूर        ७१%
अमरावती    ४७%
नाशिक        ५३%
पुणे             ७६%