संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांकडून आणखी शस्त्रसाठा हस्तगत

मुंबई : अटकेत असलेल्या संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी नालासोपाऱ्यात दडवून ठेवलेला शस्त्रसाठा हस्तगत करण्यात राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. या साठय़ात तब्बल ४१ काडतुसांचा समावेश आहे. तर पुण्यातून एटीएस पथकाने दुचाकी, कार, नऊ मोबाइल, अनेक सीमकार्डसह लॅपटॉप, हार्डडिस्क आणि कागदपत्रे हस्तगत केली आहेत. संशयितांचे अन्य साथीदार आणि त्यांचा नेमका बेत जाणून घेण्यासाठी एटीएसकडून धडपड सुरू आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार रविवारी नालासोपारा येथील वैभव राऊतच्या गोदामात दडविलेला आणखी शस्त्रसाठा हाती लागला. त्यात पाच गावठी पिस्तूल, तीन अर्धवट तयार पिस्तूल, नऊ मिलिमीटर बोअरची ११ जिवंत काडतुसे, ७.६५ मिलिमीटर बोअरची ३० जिवंत काडतुसे, शस्त्र बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या स्प्रिंग, ट्रिगर, धातूच्या नळय़ा अशा सुटय़ा भागांचा मोठा साठा हस्तगत केला गेला. तर पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरच्या व्यावसायिक गाळय़ातून लॅपटॉप, सहा हार्डडिस्क, पाच पेन ड्राइव्ह, नऊ मोबाइल, अनेक सीमकार्ड, वायफाय डोंगल, एक चार चाकी कार, एक दुचाकी आणि गुन्हय़ाशी संबंधित बरीच कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार सध्या या तिघांकडे प्राधान्याने स्फोटके, शस्त्रसाठय़ाचा नेमका वापर, ठरलेला कट आणि त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या साथीदारांबाबत चौकशी सुरू आहे. स्फोटके, शस्त्रांचे सुटे भाग कसे मिळवले, कुठून मिळवले, बॉम्ब कुठे तयार केले, शस्त्रे कुठे बांधली, त्यासाठी आर्थिक तरतूद कोणी केली, या प्रश्नांची उत्तरेही एटीएस मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. सोबत राऊत, गोंधळेकरसह शरद कळसकर या तिघांची पाश्र्वभूमी, गेल्या काही वर्षांमध्ये तिघांच्या हालचाली किंवा भूमिकेबाबत एटीएसकडून माहिती घेतली जात आहे.

अटकेला तीन दिवस लोटल्यावरही अद्याप एटीएसला या तिघांकडून नेमकी माहिती मिळालेली नाही. तूर्तास एटीएसकडून सर्व शक्यतांवर तपास आणि माहिती घेण्याची कारवाई सुरू आहे. हस्तगत शस्त्रसाठा, स्फोटकांवरून हा गट डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याप्रमाणे विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या तयारीत होता का, सण-उत्सवांच्या काळात विशिष्ट धर्माच्या गर्दीला लक्ष्य करून दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार होता का किंवा भविष्यातील कट-कारस्थानांच्या अंमलबजावणीसाठी शस्त्रागार तयार करीत होता का, अशा विविध शक्यतांवर चौकशी व तपास सुरू असल्याचे एटीएस सूत्रांकडून समजते.

राऊत गोरक्षक असून त्याने गेल्या काही वर्षांमध्ये नालासोपारा येथील मुस्लीम वस्त्यांमध्ये ईदनिमित्त जनावरांच्या कत्तलींविरोधात कार्य केले आहे. गोमांस वाहून नेणारी वाहने अडवली, चालक-वाहकास मारहाण केली, अशी माहिती एटीएसला स्थानिक पोलिसांकडून मिळाली आहे. या कारवायांमुळे निर्माण झालेला संघर्ष किंवा स्वसंरक्षणार्थ राऊत आणि साथीदारांनी हा स्फोटके आणि शस्त्रसाठा गोळा केल्याचा अंदाज सुरुवातीला होता. दरम्यान, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा केव्हा धर्माचा पगडा असलेल्या गटांकडून कारवाया होतात, कारवाईसाठीची तयारी होते तेव्हा विरोधी गटातील जहाल विचारांच्या तरुणांकडून, व्यक्तींकडूनही तयारी केली जाते. या अधिकाऱ्याच्या निरीक्षणानुसार भीमा-कोरेगाव दंगलीनंतर डाव्या विचारसरणीच्या किंवा माओवादी विचारसरणीचा पगडा असलेल्या गटांना लक्ष्य करण्यासाठी राऊत आणि आरोपींचा गट सक्रिय झाला असावा.

एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तपासाचे केंद्र पुणे असून तेथील काही व्यक्तींची चौकशी सुरू आहे. रविवारी हस्तगत झालेल्या वस्तूंमध्ये ९ मिलिमीटर बोअरच्या काडतुसांचा समावेश आहे. त्यावरून या गटाकडून आणखी शस्त्रसाठा हस्तगत होऊ शकेल, असे संकेत आहेत.

‘आताच कोणाचे नाव घेता येणार नाही’

महाराष्ट्रात ठिकठिकाणी शस्त्रसाठा सापडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या सर्व आरोपींचे विशिष्ट हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध आहेत काय, असा सवाल गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना केला असता, पोलीस तपास करीत असून अद्याप तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आताच कोणत्याही संघटनेचे नाव घेता येणार नाही, असे उत्तर पाटील यांनी दिले. अवैध शस्त्रसाठा करणारी ही मंडळी पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत. ते कोणत्या धर्माचे आहेत, याच्याशी कारवाईचा काही संबंध नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.