भीमा- कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत उमटले आहेत. आंदोलनकर्त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी लोकल सेवा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हार्बर, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून मेट्रोची सेवाही बंद झाली आहे.

मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात काही आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर हार्बर रेल्वे सलग अकराव्या दिवशीही विस्कळीत झाली आहे. गोवंडी, जुईनगर स्थानकावर आंदोलकांनी रेल रोको केला. त्यामुळे हार्बरची वाहतूकही विस्कळीत आहे. मध्य आणि हार्बरनंतर मेट्रोलाही याचा फटका बसला आहे. मुंबई मेट्रोनं सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत आपली सेवा बंद केली आहे. तर एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत मात्र मेट्रोची सेवा सुरू आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.