राज्यातील वीजदरामध्ये आगामी चार वर्षांसाठी २४.८३ टक्के एवढी दरवाढ करण्याचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा (महावितरण) प्रस्ताव फेटाळून लावत विद्युत नियामक आयोगाने चार वर्षांसाठी ५.९६ टक्के दरवाढीला मान्यता दिली आहे. सन २०१९-२० पर्यंत ही दरवाढ राहणार असून प्रत्येक वर्षी वीज दरात सरासरी एक ते सव्वा टक्क्य़ांनी वाढ होणार आहे. १ नोव्हेंबरपासून नव्या दरवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

महावितरणने पुढील चार वर्षांसाठी २४.८३ टक्के दरवाढीची याचिका विद्युत नियामक आयोगाकडे केली होती. या याचिकेवर नागरिकांकडून आणि स्वयंसेवी संस्थांकडून लेखी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. पुण्यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबई येथे दरवाढीच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली होती. त्यावर पुढील चार वर्षांचा बहुवार्षिक वीजदर निश्चित करताना सन २०१६-१७ या वर्षांसाठी सुमारे दीड टक्के वाढ मंजूर करण्यात आली असून त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांसाठी टप्प्याटप्प्याने वीजदरात वाढ होणार आहे.

untitled-2