खोटा अहवाल देणारे डॉक्टर निलंबित, कारागृह अधीक्षक सक्तीच्या रजेवर

कारागृहातील क्रौर्य

भायखळा महिला कारागृहातील मंजुळा शेटय़े या कैद्याचा मृत्यू कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतच झाला असून तिच्या शरीरावरही गंभीर जखमा असल्याची स्पष्ट कबुली शुक्रवारी राज्य सरकारने विधिमंडळात दिली. मंजुळाला मारहाण करण्यासाठी सुट्टीवरील महिला कर्मचाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले. याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यासह सहा जणांना निलंबित करण्यात आले असून खोटा अहवाल आणि प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणीही संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची तर कारागृह अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या वेळी केली.

विधानसभेत आज जयंत पाटील, अ‍ॅड. आशीष शेलार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून भायखळा येथील जिल्हा कारागृहात मंजुळा शेटय़े या कैद्याला कारागृह अधीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेदरम्यान पाटील यांनी ही घोषणा केली. दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करून कारागृहातील अधीक्षक व अन्य महिला कर्मचाऱ्यांनी शेटय़े हिला मारहाण केली असून या बेदम मारहाणीतच तिचा मृत्यू झाला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही सरकारकडे उपलब्ध असून तिच्या अंगावर १७ जखमाही आढळून आल्या आहेत. मात्र जे.जे. रुग्णालयाच्या ज्या डॉक्टरांनी याबाबत चुकीचा अहवाल दिला आणि त्याच्या आधारे न्यायालयात खोटे प्रतित्रापत्र दाखल करण्यात आले त्याला जबाबदार असणाऱ्या सर्वावर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणाही पाटील यांनी या वेळी केली.

या कारागृहातील आणखी एक कैदी इंद्राणी मुखर्जी हिला कारागृहात दिल्या जाणाऱ्या विशेष सोयी-सुविधांच्या बाबतही चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच आरोपींच्या बचावार्थ वर्गणी गोळा करण्याचे मेजेस पाठविणाऱ्या कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांचीही चौकशी केली जाईल आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही रणजित पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, अतुल भातखळकर आदींच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

विधान परिषदेतही मंजुळा शेटय़े मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर तसेच हंगामी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे यांना निलंबित करा आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वाती साठे यांना सहआरोपी करा अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली. त्यावर या दोन्ही अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा गृहराज्यमंत्र्यांनी केली.

या प्रकरणाचा सूत्रधार सरकारमध्येच : नीलम गोऱ्हे

या लक्षवेधी सूचनेच्या वादळी चर्चेत नीलम गोऱ्हे आणि हुस्नबानू खलिफे या महिला आमदारांनी धक्कादायक माहिती सभागृहाला दिली. या प्रकरणी पुरावे नष्ट करण्यात आले असून ते करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करा तसेच या प्रकरणाचा कोणीतरी सूत्रधार सरकारमध्येच आहे असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. कारागृहात पुरुष पोलीस अधिकारी महिला अधिकाऱ्यांचे लैंगिक शोषण करतात असे पत्र एका महिला अधिकाऱ्याने दिल्याची माहिती गोऱ्हे यांनी  दिली. काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनीही काही धक्कादायक बाबी उघड केल्या.