11 December 2017

News Flash

लोकहो, वीज वाचवा!

ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विजेच्या मागणीत १७ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढ झाली होती.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: October 8, 2017 2:11 AM

राज्य सरकारने वीज बचतीसाठी राज्यातील जनतेलाच साकडे घातले आहे.

हतबल सरकारचे ऊर्जा बचतीसाठी जनतेलाच साकडे

नियोजनशून्य कारभारामुळे विजेची मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारने वीज बचतीसाठी राज्यातील जनतेलाच साकडे घातले आहे. कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करून शासनाला सहकार्य करावे व भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यास मदत करावी, असे भावनिक आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केले आहे.

ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विजेच्या मागणीत १७ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढ झाली होती. मात्र विजेची ही मागणी पूर्ण करण्यात ऊर्जा विभागास अपयश आल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून भारनियमन सुरू करण्याची आफत महावितरण कंपनीवर आली आहे. सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात परतीचा पाऊस कोसळत असल्याने विजेच्या मागणीत घट झाली आहे. आज राज्यात विजेची मागणी १७ हजार ८०० मेगाव्ॉटवरून १६ हजार ५०० मेगाव्ॉटपर्यंत घटली असून  १५ हजार ७०० मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. परिणामी आज राज्यात ८०० मेगावॉटचे भारनियमन सुरू असून शुक्रवारी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे यासारख्या मोठय़ा शहरांमधील भारनियमन मागे घेण्यात आले आहे.

राज्यातील विजेची वाढती मागणी आणि पुरेशी वीज उपलब्ध करण्यात येणारे अपयश यामुळे हतबल झालेल्या राज्य सरकारे आता जनतेलाच भावनिक साद घालत वीज बचत करण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकांना वीज बचत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गरज नसताना विजेचा वापर टाळावा. घरात सर्व ठिकाणी एलईडी बल्ब, टय़ूबलाइटचा वापर करावा. आवश्यकता नसेल तर पंखे सुरू करू नयेत. गरज असेल तेव्हाच एअर कंडिशनचा उपयोग करावा. टी.व्ही., पंखे सतत सुरू ठेवू नये. ज्या भागात भारनियमन नाही अशा भागातील नागरिकांनी वीज सुरू असतानाही किमान दोन तास वीज वापर स्वत:हूनच बंद ठेवावा. अशा उपाययोजना केल्या तर वीज बचत होईल व ज्या भागांना वीज मिळत नाही अशा भागांना वीजपुरवठा करून त्या नागरिकांनाही भारनियमनाच्या संकटापासून दिलासा देणे शक्य होईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महानगर परिषदा, नगरपरिषदा, ग्रामपंचायतींनी पथदिवे तासभर उशिरा सुरू करून पहाटे पाच वाजता बंद करावे. अनेक ठिकाणी दिवसभर पथदिवे सुरू असतात. विजेचा असा अपव्यय टाळावा. शासकीय व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी दिवसाच्या वेळी लाइटचा वापर करू नये. अत्यंत आवश्यक असेल तेथे दिवसा लाइट वापरावे.

कार्यालयाच्या बाहेर जाताना लाइट, पंखे सुरू राहणार नाही, याची काळजी घ्यावी. आठवणीने लाइट, पंखे बंद करावेत. या उपाययोजनांतून वीज बचत करून शासनाला सहकार्य करावे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

First Published on October 8, 2017 2:05 am

Web Title: maharashtra government appeal people to save energy