पंढरपूरमधील चंद्रभागा प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने तिच्या वाळवंटात आणि पात्रात कुठल्याही प्रकारच्या कामास उच्च न्यायालयाने एकदा नव्हे तर दोन वेळा आदेश देऊन बंदी घातली होती. असे असतानाही २६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची सबब पुढे करीत चार दिवसांसाठी चंद्रभागेच्या पात्रात आणि वाळवंटात भजन-कीर्तनासह तात्पुरत्या राहुटय़ा उभारण्याच्या परवानगीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने बंदीचे आदेश देऊन सहा महिने उलटल्यानंतर आता सरकारला अचानक जाग कशी आली, असा उपरोधिक सवाल करीत न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केला. तसेच बंदीचे आदेश देणाऱ्या खंडपीठाकडेच ही परवानगी मागा, असे स्पष्ट करीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  डिसेंबर २०१४ आणि मार्च २०१५ मध्ये चंद्रभागेच्या पात्रात बांधकामांना बंदी घातली होती.